

Work on the Municipal Corporation's C&D project is in the final stage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणारा मलबा रस्त्यांच्या कडेला व मोकळ्या जागांवर टाकण्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता आहे.
चिकलठाणा येथे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेला बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया (सीॲण्ड डी) प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून, येत्या महिनाभरात तो कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात दररोज १०० टन डेबरीजवर प्रक्रिया करून त्यापासून रेती, ब्रिक्स, आयब्लॉक, पेव्हर ब्लॉक आणि टाइल्स तयार केल्या जाणार आहेत. त्यामुळे संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीर मलब्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सुटण्यासोबतच त्याच्या पुनर्प्रक्रियेतून बांधकाम साहित्य उपलब्ध होणार आहे.
बांधकाम आणि पाडकामातून निघणारा मलबा शहरातील रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांवर तसेच अन्य ठिकाणी टाकला जातो. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होण्याबरोबरच धूळ आणि प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. हा मलबा उचलण्यासाठी महापालिकेलाही खर्च करावा लागतो. सीॲण्ड डी प्रकल्प सुरू झाल्यानंतर शहरातून निर्माण होणाऱ्या या मलब्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार असल्याने या समस्येला आळा बसण्याची अपेक्षा आहे.
महापालिकेने या प्रकल्पासाठी कोलकाता येथील सी फ्लो कंपनीसोबत करार केला आहे. प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी कंपनीला चिकलठाणा येथे जागा देण्यात आली आहे. कंपनीने गतवर्षी नोव्हेंबरमध्येच मशिनरी आणली होती. मात्र, प्रकल्पाच्या परिसरात बायोमायनिंगचा मोठ्या प्रमाणावर कचरा पडून असल्याने अंतर्गत रस्ता तयार करण्याचे काम रखडले होते.
आयुक्त अमोल येडगे आणि महापौर समीर राजूरकर यांच्या पाठपुराव्यानंतर हा कचरा हटविण्यात आला. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली असून संबंधित कंपनीचे मुंबई, पुणे आणि नाशिक येथेही प्रकल्प असल्याची माहिती महापालिकेने दिली. चिकलठाणा प्रकल्पासाठी २ कोटी ८४ लाख रुपयांची मशिनरी, तर सुमारे एक कोटी रुपये सिव्हील वर्कसाठी खर्च केले जात आहेत. प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे साडेतीन कोटी रुपये असल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता अमोल कुलकर्णी यांनी दिली.