मोबीन खान
वैजापूर : पांढऱ्या सोन्याचा माहेरघर म्हणून वैजापूर बाजारपेठेत प्रसिध्द आहे. तालुक्यात दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर कापसाच्या बाजार पेठेत कोटीच्या घरात उलाढाल असायची यंदा मात्र, परतीच्या बाजारपेठेला पावसाने फटका बसला आहे. कापसाच्या बाजारपेठेतील अर्थ चक्र कोलमडले आहे.
अजूनही पांढऱ्या सोन्याची आवक म्हणावी तशी सुरु न झाल्याने बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट आहे. तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने खरीप हंगामातील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. येथील कापसाच्या खासगी बाजारपेठेत नवरात्रच्या मुहूर्तावर कापूस खरेदीचा मुहूर्त साधला जातो. या बाजारपेठेत दसऱ्यापासून कापसाची आवक सुरु होते. आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खरेदीला सुगीचे दिवस असतात. दररोज हजार ते दीड हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी असे दरवर्षीचे चित्र आहे.
यंदा परतीच्या पावसाने अशी मार दिली की कापासाचे बोंडदेखील नवरात्रोत्सव काळात शेतकऱ्यांच्या घरात आले नाही. येथील व्यापाऱ्यांनी तुरळक प्रमाणात येणाऱ्या कापसावर खरेदी सुरू केली. कापसाची आवक पाहता व्यापाऱ्यांचा दैनंदिन खर्चही निघत नाही. दिवसभरात शहरात २५ ते ३० क्विटलची आवक आहे, तर तालुक्यात ही आवक १०० ते १५० क्विंटलच्या घरात आहे. परतीच्या पावसाने कापसाचे उत्पन्न प्रचंड प्रमाणात घटविल्याने येथील बाजारपेठेच्या इतिहासात प्रथमच इतका शुकशुकाट जाणवत आहे.
शेतकरी उत्पादनाअभावी हवालदिल झाले आहे मजुरांच्या हाताला काम नाही. दुसरीकडे तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून शासकीय कापूस खरेदीला मुहूर्त निघालेला नाही, त्यामुळे शेतकरी खासगी चाजार पेठेवरच अवलंबून असतात. यंदा बाजारात विक्रीसाठी कापूस ओला येत असल्याने ६,२०० ते ६६०० रुपये क्विटलचा दर मिळत आहे.
दरम्यान, यंदा परतीच्या पावसामुळे कापसाच्या उतपन्नावर ५० टक्के फरक पडणार आहे. ओला कापूस बाजारात येत असल्याने कापसाचे बाजार ६,२०० ते ६६०० वर लॉक झाले आहे. गुजरातमध्ये अजूनही कापसाची खरेदी सुरू झालेली नाही. जिनिंग सुरू झालेले नसल्याने बाजार थंडावलेले आहे असे कापसाचे व्यापारी भागवत घोडेकर, यांनी सांगितले.
एकवेळ होती की कापसाची वेचणी करून घरी आणल्यानंतर त्यावर पाणी मारून घरात ठेवले जायचे, जेणेकरून कापसाचे वजन जास्त भरेल आणि फायदा होईल. व्यापारी देखील कापूस खरेदी करताना गाडीत पाणी मारून भरत असे. आता परिस्थिती उलटी झाली असून, अतिपावसामुळे वेचणीवर आलेला कापूस ओला होत आहे. हा कापूस उन्हात टाकून सुकविल्या नंतरच विक्री करण्याची वेळ आली आहे. यंदा शेतकऱ्यांचे सर्वच आर्थिक गणित बिघडल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.
तालुक्यात नवरात्रोत्सवाच्या आधी मध्यप्रदेश व गुजरात मधील हजारो मजूर जिनिंग व कापूस वेचणीसाठी येतात. अजूनही कपाशी फुटली नाही व खरेदी केंद्र सुरू न झाल्याने हे मजूर आता कांदा लागवड व मका सोंगणी करताना दिसत आहे.