पैठण ; पुढारी वृत्तसेवा
पैठण शहरातील साळीवाडा येथील एका (४४ वर्षीय) इसमाचा मृतदेह आज (बुधवार) सकाळी पाण्यात तरंगताना आढळून आला. योगेश आनंद खुस्तुले रा. साळीवाडा पैठण असे मृत इसमाचे नाव आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, नाथसागर धरणावर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी व धरण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धरणाच्या पाण्यामध्ये एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची खबर पैठण पोलिसांना दिली. यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल, पो. हे. कॉन्स्टेबल समाधान भागीले, श्रीराम चेडे यांनी घटनास्थळी पाहणी करून सदरील नाथसागर धरणात तरंगत असलेला मृतदेह नागरिकाच्या मदतीने पाण्याबाहेर काढून पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठवला.
या घटनेची खबर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना देण्यात आली. योगेश आनंद खुस्तुले या मृत तरुणाची ओळखी संदर्भात खात्री केली. या संदर्भात पैठण ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.