

Students beaten with iron pans at sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चिकलठाणा पोलिस : ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मांडकी येथील विशेष शाळेतील दोन गतिमंद विद्यार्थ्यांना शाळेतील शिपायासह एका कर्मचाऱ्याने किचनमधील लोखंडी तव्याने मारहाण केली. ही संतापजनक घटना जून ते ऑक्टोबर दरम्यान घडली. घटनेचे व्हिडिओ समोर आले होते. या प्रकरणाची दखल घेत दिव्यांग महामंडळाकडे अंतर्गत चौकशी केली. अहवालानंतर या प्रकरणी शाळेच्या दोन केअर टेकर विरुध्द अपंग अधिकार अधिनियम कायद्यानुसार चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपक गोविंद इंगळे (रा. मांडकी, गोपाळपूर) आणि प्रदीप वामन देहाडे (रा. केरळा ता सिल्ल रोड) अशी आरोपींची नावे आहेत. मांडकी शिवारात शाळा आहे. त्या शाळेत २०१८ मध्ये एका गतिमंद विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर याप्रकरणाची दखल घेत दिव्यांग महामंडळाने शाळा प्रशासनाला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर जुन २०२५ मध्ये देखील केअर टेकरने एका मुलाला तव्याने मारहाण केल्याचे समोर आले. याप्रकरणाची दखल घेत दिव्यांग महामंडळाने चौकशी केली. चौकशी दोनही कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी सखाराम पोळ यांच्या तक्रारीवरून दोन केअर टेकर विरुध्द चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.