

Shortage of water in Municipal Corporation's artificial immersion tanks
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवात श्रद्धेने पूजलेल्या गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांची पाचव्या दिवशीच दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील काही तलावांमध्ये मोठ्या संख्येने गणेशमूर्ती जमा झाल्या असून, पाण्याची पातळी कमी झाल्याने विसर्जित मूर्ती एकमेकांवर पडल्या आहेत. गणरायाच्या मूर्तीची अशी अवस्था पाहून गणेशभक्तांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील विविध भागांत साधारण ३ बाय १२ मीटर आकाराचे कृत्रिम तलाव तयार केले आहेत. पाचव्या दिवशी मोठ्या संख्येने घरगुती गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर या तलावांमध्ये मूर्तीची संख्या वाढली. त्यातच काही तलावांतील पाण्याची पातळी कमी झाल्याने विसर्जित मूर्ती पाण्यात व्यवस्थित राहण्याऐवजी एकमेकांवर पडलेल्या दिसून येत आहेत.
दरम्यान, गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून पाच दिवस भक्तिभावाने पूजा केल्यानंतर भाविक गणरायाला निरोप देतात. त्यामुळे विसर्जनानंतर मूर्तीची अशी अवस्था पाहणे भाविकांसाठी वेदनादायी ठरत आहे. श्रद्धेने आणलेल्या गणेशमूर्तीचा योग्य पद्धतीने विसर्जन होण्यासाठी कृत्रिम तलावांमध्ये पुरेसे पाणी आणि आवश्यक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र, पाचव्या दिवशीच काही तलावांमध्ये मूर्तीची गर्दी झाल्याने व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तसेच २५ सप्टेंबरला घरगुती गणपतींसह गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे कृत्रिम तलावांकडे येणाऱ्या मूर्तीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे पाचव्या दिवसाच्या विसर्जनानंतरच काही तलावांमध्ये मूर्ती एकमेकांवर पडलेल्या दिसत असताना २५ सप्टेंबरच्या मोठ्या विसर्जनावेळी परिस्थिती कशी हाताळली जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर महापालिकेने त्यापूर्वीच कृत्रिम तलावांची पाहणी करून पाण्याची पातळी वाढविणे, उपलब्ध जागेचे नियोजन करणे आणि मूर्तीची योग्य हाताळणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे गरजेचे आहे. यासह गणेशभक्तांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन विसर्जन व्यवस्था सक्षम करण्याची मागणी होत आहे.
व्यवस्था सक्षमणाचे मनपापुढे आव्हान
गणेश विसर्जनासाठी महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये पाचव्या दिवशीच मोठ्या संख्येने मूर्ती जमा झाल्या. काही तलावांतील पाणी कमी झाल्याने मूर्ती एकमेकांवर पडल्या आहेत. अजून मोठ्या संख्येने विसर्जन बाकी असल्याने २५ सप्टेंबरपूर्वी महापालिकेला व्यवस्था सक्षम करावी लागणार आहे.