वैजापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या शनिदेवगाव येथील बंधाऱ्याला प्रशासकीय मान्यता मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.१४) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे.
वैजापूर -श्रीरामपूर तालुक्याला जोडणारा शनिदेवगाव बंधाऱ्याला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाल्याने गंगा थडी भागातील सिंचनासह दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. हा बंधारा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत गोदावरी खोऱ्यात असून तालुक्यातील या प्रकल्पामुळे ८.८४ दलघमी पाणीसाठा निर्माण होणार आहे. त्यामुळे १९७८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून या बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रातील नादुरुस्त अवस्थेतील कमालपूर व खानापूर या कोल्हापुरी बंधाऱ्यांचा पाणी वापर शनीदेवगाव बंधाऱ्यातून करण्यात येईल. तसेच मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा दळवळनाचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या बंधाऱ्याचा कालावधी संपल्याने बंधाऱ्यावर मोठ- मोठे खडे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले असून दोन्ही बाजूने कठाडे नसल्याने तोल जाऊन काही जणांचा मृतदेखील झाला आहे. त्यामुळे गंगाधडी भागातील नागरिकांनी अनेक वेळा या बंधाऱ्याची दुरुस्ती किंवा नवीन बंधारा व्हावा, म्हणून आंदोलने केली होती. तर राजकीय पक्षांनी देखील यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले होते. मात्र याबद्दल दखल घेण्यात आली नव्हती. मागील वर्षी देखील मंत्री मंडळाची मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथे बैठक पार पडली. त्या बैठकीत देखील या बंधाऱ्यास तत्वता मान्यता दिली होती. अन् काल दि.(१४) रोजी मुंबई येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बंधाऱ्यास अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली.