हतनूर : पुढारी वृत्तसेवा
कन्नड तालुक्यातील हतनूर येथील शिवना नदीत पोहायला गेलेल्या गोकुळ साहेबराव गुंजाळ (वय ११, रा.हतनूर) या इयत्ता चौथीतील शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना हतनूर येथे घडली. या घटनेची खबर पोलीस ठाण्यात मिळताच हतनूर पोलीसांनी धाव घेतली.
शाळेला आज २ आक्टोबर महात्मा गांधी जयंती असल्यामुळे सुट्टी होती. शाळकरी मुलांची पोहण्यासाठी शिवना नदीत गर्दी होती. दुपारी गोकुळ गुंजाळ हाही आपल्या मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला होता. या वेळी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने गोकुळ नदीपात्रात बुडू लागला. त्याला बुडताना पाहताच नदीकाठावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांनी नदीकडे धाव घेत पाण्यात उडय़ा घेऊन गोकुळला पाण्यातून बाहेर काढले. त्याला उपचारासाठी येथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.