पैठण : पुढारी वृत्तसेवा
राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक, चालक, कर्मचाऱ्यांनी आज (मंगळवार) सकाळपासून विविध मागण्यासाठी बस सेवा बंद ठेवून संप पुकारला आहे. या संपामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली आहे. दरम्यान या आंदोलनात पैठण येथील आगारातील लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील ७० बस फेऱ्या बंद ठेवून चालक, वाहक, कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतल्याची माहिती पैठण आगार प्रमुख गजानन मडके यांनी दिली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगासह राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ मिळावी यासह प्रलंबित मागण्यासाठी आज (मंगळवार) पासून एस. टी बस बंद ठेवून संप पुकारला आहे. यामुळे पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी शहरी भागातील वास्तव्यास असलेले शेतकरी, प्रवासी या निमित्त गावाकडे येऊन हा सण साजरा करून दुसऱ्या दिवशी शहराला जातात, मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा बंद केल्याने या प्रवाशांसह शेतकऱ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. यामध्ये अनेक शासकीय कार्यालयाचे दररोज अपडाऊन करणारे अधिकारी, कर्मचारी वर्गाचा समावेश आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात देखील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मोठा परिणाम झालेला आहे.