

Municipal Administrator orders to deposit two months' salary of contract workers into their accounts
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेला कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या महाराणा एजन्सी आणि प्रशासन यांच्यातील वादामुळे १६०५ कर्मचार्यांचा तीन महिन्यांचा पगार थकला आहे. कर्मचाऱ्यांचा दसरा पगाराविना गेल्याने त्यांची दिवाळी गोड करा, असे आदेश देत महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी २ महिन्यांचा पगार थेट या कंत्राटींच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांना सोमवारी (दि. १३) दिले.
महापालिकेला कंत्राटीतत्त्व मनुष्यबळ पुरविणाऱ्या महाराणा एजन्सी आणि महापालिका प्रशासन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. कंत्राटींना महाराणा एजन्सी किमान वेतनानुसार पगार देत नाही. त्यांचे पीएफ, ईएसआयसीचे हप्ता भरत नाही.
कर्मचाऱ्यांच्या सततच्या या तक्रारीनंतर प्रशासकांची तपासणी केली. त्यात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराणा एजन्सीला नोटीस बजावण्यात आली. त्यांच्या कारभाराची चौकशी करून कंत्राटींचा थकीत पगार देण्याचे आदेश दिले. परंतु एजन्सीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा दसरा सण पगाराविनाच गेला.
दरम्यान, हा प्रकार जेव्हा प्रशासकांना कळाला, तेव्हा त्यांनी कंत्राटींची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला. दोन वेळा एजन्सीशी पत्रव्यवहार केल्यानंतर आता प्रशासकांनी महापालिकेच्या वतीने थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. एक रुपयाही महाराणा एजन्सीला न देता आज मंगळवारी दोन महिन्यांचे थकीत वेतन थेट या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे आता कंत्राटींची दिवाळी गोड होणार आहे.
महानगरपालिकेत वेगवेगळ्या विभागात जवळपास सोळाशे पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी कामाला आहेत. या १६०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याला महापालिकेला ३.५० कोटी रुपयांचा निधी लागतो. त्यानुसार या कंत्राटींचा दोन महिन्यांचा पगार करण्यासाठी महापालिका ७ कोटी रुपये खर्च करणार आहे. दिवाळीपूर्वी पगार खात्यात जमा होणार असल्याने कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.