छत्रपती संभाजीनगरः भाजपाचे सरचिटणीस संजय केणेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचे पडसाद उमटत असून मराठा आंदोलक आक्रमक होत चालले आहेत. शुक्रवारी सिडको पोलिस स्टेशनसमोर ठिय्या मांडल्यानंतर आंदोलकांनी शनिवारी (दि.१९) केणेकर यांच्या क्रांती चौकाजवळील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत, त्यांचा निषेध व्यक्त केला.
यावेळी आंदोलक केणेकर यांच्या कार्यालयासमोर दुपारी एक वाजेच्या दरम्यान जमा झाले. घोषणांनी आंदोलकांनी क्रांती चौक परिसर दणाणून सोडला होता. परंतु; थोड्या वेळातच आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत. फक्त निषेध व्यक्त करायचा आहे, असे सांगून आंदोलन तिथून निघून गेले. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. त्यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये काहीवेळ शाब्दिक चकमक झाली होती.
दरम्यान, आचारसंहितेपूर्वी मराठा आंदोलकांवर समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांनी राज्य सरकारकडे केली होते. परंतु सरकराने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे जरांगे हे राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहे. या टीकेवर उत्तर देताना, भाजपचे सरचिटणीस संजय केणेकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचेच पडसाद गेल्या दोन दिवसांपासून शहरात दिसून येत आहेत. यावेळी किशोर बलांडे, सुधाकर शिंदे, बाबासाहेब डांगे, कृष्णा गाडेकर, नंदू मोठे, सुदाम गायकवाड, योगेश पाथ्रीकर, भरत भुमे, शुभम जगताप, शिवाजी काकडे, रामू पठाडे, आकाश साळुके, संभाजी कोलते आदींची उपस्थिती होती.
आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन करून विना परवाना आंदोलन करण्यात आले. त्यामुळे, आंदोलकांवर नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले. दरम्यान, आचारसंहितेतही गुन्हे दाखल करुन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. केणेकरांचे वक्तव्य निंदनीय आहे. या दबावाला आम्ही घाबरणार नाही असे आंदोलक किशोर बलांडे यांनी सांगितले. Maratha Aandolan News|