विवाहितेच्या गर्भपाताला कारणीभूत; पतीसह चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी

विवाहितेच्या गर्भपाताला कारणीभूत; पतीसह चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी
Chhatrapati Sambhajinagar news
विवाहितेच्या गर्भपाताला कारणीभूत; पतीसह चौघांना पाच वर्षे सक्तमजुरीfile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : लग्नात हुंडा न दिल्याच्या कारणावरून सतत विवाहितेचा छळ करून गर्भवती असताना मारहाण करून तिच्या गर्भपाताला कारणीभूत ठरलेल्या पतीसह सासू, सासरा व दिराला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी पाच वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली प्रत्येकी २६ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ही दंडाची रक्कम पीडितेला देण्याचेही आदेशात म्हटले आहे.

पैठण तालुक्यातील जयश्री विक्रम पोटफाडे (२४, रा. इंद्रानगर) यांचा २ फेब्रुवारी २००६ रोजी विवाह झाला होता. विक्रमचे पैठणमध्ये पैठणी साडीचे दुकान आहे. लग्नानंतर १०-१५ दिवसांनी त्याने पीडितेला तू मला आवडत नाही, तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही. त्यामुळे मी तुला पत्नीचा दर्जा देत नाही, असे म्हणून शिवीगाळ, मारहाणीला सुरुवात केली. पीडितेच्या माहेरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ती त्रास सहन करत होती.

दरम्यानच्या काळात पीडितेने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर पीडिता पुन्हा गर्भवती राहिली. ही बाब पीडितेने सासरच्या मंडळींना सांगितली. त्यावर सासरच्या मंडळींनी पीडितेला तू माहेराहून दुकानात कपडे भरण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणत पुन्हा छळ सुरू केला. शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवणे असे प्रकार सुरू असताना पीडितेला घराबाहेर काढण्यात आले.

हा प्रकार पीडितेने माहेरी सांगितला. यानंतर पती विक्रम भानुदास पोटफाडे (२६), सासरा भानुदास तोलीराम पोटफाडे (४९), सासू तारामती भानुदास पोटफाडे (४६) आणि दीर सागर भानुदास पोटफाडे (२१, सर्व रा. इंद्रानगर, ता. पैठण) यांची समजूत काढली. मात्र, त्यानंतरही पीडितेचा छळ सुरूच ठेवला. यावेळी पीडितेला माहेराहून एक लाख रुपये आणत नाही तर तुला घटस्फोट देईल असे म्हणून गर्भवती असताना पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीनंतर तिला वडिलांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले. तेव्हा डॉक्टरांनी गर्भ पाडला नाही तर बाळाच्या तिच्या जीविताला धोका असल्याचे सांगितले.

ही बाब पीडितेच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना सांगितली. त्यावर त्यांनी पीडितेच्या वडिलांना शिवीगाळ करून घरातून हाकलून लावले. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी अभियोक्ता एम. एम. अदवंत आणि एन. बी. धोंगडे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने चौघांना भादंवि कलम ३१३ अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी २५ हजारांचा दंड, भादंवि कलम ३२३ अन्वये एक वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Chhatrapati Sambhajinagar news
पुणे : विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तरूणास पाच वर्षे सक्तमजुरी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news