

गंगापूर ( छत्रपती संभाजीनगर ) : दीपावलीनिमित्त फटाके खरेदी करून घरी परतणाऱ्या तीन तरुणांच्या भरधाव क्रेटा कारला ढोरेगावजवळ भीषण अपघात झाला. सोमवारी (दि.१३) रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत एक जण जागीच ठार झाला, तर दोन गंभीर जखमी झाले. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील राज चेतन चव्हाण (२४), सुमित साळुंके (२१) आणि सोहन आहेरकर (२१) हे तिघे दीपावलीसाठी फटाके खरेदी करण्यासाठी कार (एमएच २० ईजे ६३९३) मधून गंगापूर येथे आले होते. खरेदी करून रात्री उशिरा परतताना ढोरेगाव येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ कारचे टायर अचानक फुटले. त्यामुळे वाहनाचा ताबा सुटून कारने सुमारे चार ते पाच पलट्या घेत रस्त्याच्या खाली भीषण आपटली. अपघात इतका गंभीर होता की, कारमधील एक जण जागीच ठार झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सारंगपूर येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणिजधाम यांच्या २४ तास मोफत रुग्णवाहिका सेवेचे पायलट संदीप त्रिंबके, बाबा कराळे व शुभम त्रिंबके, बाबा कराळे व शुभम वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालय (घाटी) येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच एका व्यक्तीस मृत घोषित केले. जखमी दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
शिऊर : शिऊर बंगला कन्नड या मार्गावर भटाणा गावाजवळ सोमवारी (दि.१३ रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या दुचाकी-टँकरच्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. आदित्य अप्पासाहेब मगर (१९, रा. कोल्ही, ता. वैजापूर) असे मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या नातेवाइकाला भेटण्यासाठी बोलठाण येथे निघाला होता. त्याच्यासोबत त्याचा नातेवाईक मित्रही दुचाकीवर (एमएच २० बी ई ९४८७) होता. दोघे शिऊरमार्गे भटाणा गावाजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडकेत आदित्यचा जागीच मृत्यू झाला.