

छत्रपती संभाजीनगर : शहरासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून हवामानत अचानक बदल झाला असून, दिवसा प्रखर ऊन तर संध्याकाळी थंड गारवा आणि काही ठिकाणी हलका पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील काही भागांत बुधवारी (दि.१५) सकाळी हलक्या सरी कोसळल्या असून, लगतच्या काही गावांमध्ये जोरदार वार्यासह पाऊस पडल्याने नागरिक व शेतकरीवर्गामध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
शहर व परिसरात दिवाळीचा उत्साह वाढत असतानाच हवामानातील शहर व परिसरात दिवाळीचा - उत्साह वाढत असतानाच हवामानातील - अनपेक्षित बदलामुळे दुपारी कडक ऊन, तर सूर्यास्तानंतर थंडीची चाहूल लागली आहे. तसेच काही ठिकाणी अचानक पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागात शेतातील ओलसरता वाढल्याने कापूस, ज्वारी व तूर पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहणार असून, येत्या दोन दिवसांत हलक्या सरींचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. दिवसभरात तापमानात तीन ते चार अंशांनी घट झाली असून, रात्रीचे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान शहरात सकाळी थंडगार वारे वाहत असून, दुपारच्या सुमारास प्रखर ऊन आणि नंतर पुन्हा संध्याकाळी थंड गारवा जाणवत असल्याने हवामानाने एका दिवसात तीन ऋतू अशी अनुभूती नागरिकांना दिली आहे.
अनेक भागांतील वीज गुल
अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, औरंगपुरा, मिलकार्नर यासह परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. दरम्यान, दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे किराणा, कपडा व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी विविध माल मागवला आहे. मात्र दिवाळीसाठी मागवलेला माल या पावसाच्या पाण्यात भिजल्याने काही व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले.
विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस
शहरात बुधवारी (दि. १५) सकाळी हसूल, सिडको, हडकोसह अनेक भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तर रात्री नऊ वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुकुंदवाडी, चिकलठाणा, जालना रोड, पुंडलिकनगर, गजानननगर, भावसिंगपुरा, छावणी, मिलकार्नर यासह विविध भागांत जोरदार पाऊस झाला. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गेलेल्या नागरिकांसह दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली.