पिशोर: शालेय पोषण आहारातील तांदळासह इतर साहित्य अज्ञात लोकांच्या मदतीने टेम्पोतून घेऊन जात असताना शाळेतील मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी बुधवारी (दि.४) रात्री रंगेहाथ पकडले. शेख अश्पाक असे या मुख्याध्यापकाचे नाव असून त्याच्यावर पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकोद येथील या जिल्हा परिषद शाळेला गुरुवारी (दि.५) छत्रपती संभाजीनगर येथे उपक्रमशील शाळा म्हणून पुरस्कार मिळणार होता व संशयित मुख्याध्यापक स्वतः हा पुरस्कार स्वीकारायला जाणार होता. परंतु सध्या तो फरार आहे.
याविषयी अधिक माहिती अशी, बुधवारी वाकद येथील जिल्हा परिषद शाळेत रात्री अकराच्या सुमारास गावातील काही युवकांना शाळेजवळून आवाज जाणवला. या युवकांनी शाळेकडे धाव घेतली असता त्यांना येथे काही अनोळखी लोक पोषण आहाराचे तांदूळ व इतर साहित्य एका टेम्पोत भरत असल्याचे निदर्शनास आले. लाजिरवाणी बाब म्हणजे हा सर्व चोरीचा प्रकार खुद्द मुख्याध्यापक शेख याच्या डोळ्यादेखत घडत होता. गावातील युवकांनी मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडून ही बाब शालेय समिती अध्यक्ष, पदाधिकारी, सरपंच, केंद्रप्रमुख व पिशोर पोलिसांना कळविली. त्यानंतर मुख्याध्यापक शेख शहरातून पसार झाला. पिशोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून साठवण खोली सील केली. त्यानंतर पिशोर पोलिसांनी हा टेम्पो पोलिस ठाण्यात नेऊन मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला. या मुख्याध्यापकावर कारवाई करून त्याला निलंबित करावे, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.