घाटनांद्रा : तरूणाचे अपहरण करून खंडणी न दिल्याने त्याचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याचा धक्कादायक प्रकार घाटनांद्रा येथे उघडकीस आला. कैलास नामदेव मोरे (वय ३५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय राजेंद्र मोरे या गावातीलच तरूणाला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुरूवारी (दि.२६) अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी, घाटनांद्रा येथील सेवा निवृत्त सैनिक नामदेव भुरकाजी मोरे यांचा मुलगा कैलास मोरे हा तरूण शनिवारी (दि.२१) सकाळी दहापासून अचानक बेपत्ता झाला. नामदेव मोरे व त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. त्यानंतर वडील नामदेव मोरे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात कैलास बेपत्ता असल्याची माहिती दिल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी कोल्हे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू केला. अखेर येथील संजय मोरे याने अपहरण करून खंडणी न दिल्याने कैलासचा खून करुन मृतदेह शेतात पुरुन टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी संजय मोरे याला अटक करण्यात आली.
कैलास मोरे याच्या मोबाईलवरून आलेल्या शेवटच्या काॅलच्या आधारे तपास करण्यात आला. यादरम्यान घाटनांद्रा येथील संजय मोरे याचे नाव समोर आले. संजयविषयी पोलिसांनी गोपनिय माहिती घेतली असता त्याला शेअर मार्केट ट्रेडिंग खेळण्याचा छंद होता. त्याच्यावर क्रेडिटचे कर्ज झाले होते व इतरही काही लोकांकडून त्याने कर्ज घेतलेले असल्याने तो कर्जबाजारी झालेला होता.
त्याने शनिवारी (दि.२१) सकाळी त्याने कैलास मोरे शेतामध्ये बोलावून घेतले व त्याला पैशाची मागणी केली. कैलास याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्या ठिकाणी दोघांचा वाद झाला व संजय मोरे याने कैलासचा गळा आवळून खून केला. व त्याचे प्रेत शेतात खड्डा खोदून पुरून टाकले. त्यानंतर त्याने कैलासच्या मोबाईलवरून कैलासचा भाचा जीवन ज्ञानेश्वर निकम यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप मॅसेज टाकत कैलास माझ्या ताब्यात असल्याचे सांगत ३० लाखाच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी कैलासच्या फोन कॉल तपासले असता यादरम्यान संजय मोरे याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी संजय मोरे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, लहुजी घोडे, सचिन सोनार, राजेंद्र काकडे, अनंत जोशी, रंगराव बावस्कर, ज्ञानदेव ढाकणे यानी केला.