पैठण / लोहगाव : शेतातील गवत उपटण्याच्या कारणावरून पैठण तालुक्यातील तोंडोळी येथे एका कुटुंबात जोरदार हाणामारीची घटना घडली. दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या भांडणात भावानेच भावाचा खून केल्याची घटना शनिवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नसरुद्दीन करीमोद्दीन शेख (५५, रा. तोंडोळी, ता. पैठण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी भावाविरुध्द शेख मोईन शेख करिमोद्दीन विरुद्ध बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तोंडोळी गावालगत फिर्यादी व मयताचा मुलगा शेख असलम शेख नसरुद्दीन यांच्या कुटुंबाची सामायिक शेती गट नं. १०३ आहे. शेख मोईन शेख करिमोद्दीन याने शुक्रवारी (दि.२०) त्यांचे सामायिक शेतात पेरलेले जनावरांना खावयाचे गवत नसिरुद्दीन करिम्मोदीन शेख यांनी उपटण्याचे कारणावरून भांडण केले होते. शनिवारी पुन्हा त्याच भांडणाच्या कारणावरून राग मनात धरून नसिरुद्दीन यांच्या डोक्यावर, गुडघ्यावर, पाठीवर लाकडी दांड्याने मारून गंभीर जखमी केले.
यात नसरुद्दीन करीमोद्दीन शेख यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा शेख असलम शेख नसिरुद्दीन (वय २२) यांनी बिडकीन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत.