

A woman performing Shatapavali was robbed of her one and a half tola ganthan
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री साडेनऊच्या सुमारास उल्कानगरी भागातील ऑगस्ट होम ते स्टेडियम रस्त्यावर घडली.
फिर्यादी कोमल मधुकर शेळके (२८, रा. योगेश्वरी अपार्टमेंट, उल्कानगरी) यांच्या तक्रारीनुसार, त्या कॅनरा बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत. रात्री जेवण झाल्यानंतर त्या ऑगस्ट होमकडून स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावर शतपावली करत होत्या. साडेनऊच्या सुमारास आनंद मंगल टूर्स समोर दो-घेजण दुचाकीने त्यांच्या समोरून आले.
त्यातील एकाने गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण हिसकावून पसार झाले. दुचाकी चालविणाऱ्याने हेल्मेट घातलेले होते. तर मागे बसलेला मेहंदी रंगाचे जॅकेट, डोक्यावर निळसर टोपी घातलेला होता. कोमल यांनी आरडाओरड केली मात्र, चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार बतावणी, चेन स्नॅचिंगच्या घटना घडतात. यापूर्वी घडलेल्या घटनांपैकी एकही उघड करण्यात जवाहरनगर पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.