छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि गुजरात पोलिसांनी उघडकीस आणलेल्या २५० कोटींच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वाळूज एमआयडीसीतील एका केमिकल्स कंपनीत जितेश हिनहोरिया एमडी ड्रग्जची निर्मिती करायचा, अशी खबर डीआरआय पथकाला मिळाली होती. त्यावरून २०ऑक्टोबरला त्यांनी त्या कंपनीत छापा मारून मोठ्या प्रमाणात रसायन सील केले आहे. मुख्य आरोपी जितेश हिनहोरिया या कंपनीचा रासायनिक सल्लागार आहे. तो कामगारांना उलटी, मळमळीची भीती घालून ड्रग्जची निर्मिती करीत असल्याचे समोर आले आहे. (Chh. Sambhajinagar Drug Case)
गुजरात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका ड्रग्ज पेडलरला अटक केली होती. त्याच्या तपासात जितेश हिनहोरियाचे कनेक्शन उघड झाल्यावर त्यांनी तब्बल २० दिवस पाळत ठेवून २२ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरात दोन कंपन्या सील केल्या. येथे 23 किलो कोकेन, ७.४ किलो, मेफेड्रोन, 4.3 किलो केटामाइन, 9.3 किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण आणि सुमारे 30 लाख रुपये रोकड असा २५० कोटींचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, जितेश हिनहोरिया आणि संदीप कुमावत या दोघांना अटक केली.
हिनहोरियाने डीआरआयच्या ताब्यात असताना खिडकीच्या काचेने गळा व मनगट कापून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथे एक अधिकारी आणि पाच पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. त्याने जीव संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिडको ठाण्यात दाखल केला. त्यात हिनहोरिया हा वाळूजमधील एका केमिकल्स कंपनीत एमडी ड्रग्ज तयार करीत असल्याची माहिती डीआरआय पथकाला मिळाली होती. त्यावरूनच कंपनीत छापा मारल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, या कंपनीत ड्रग्जची निर्मिती केली जायची का? हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळेच कंपनी मालकाला आरोपी बनविलेले नाही, असेही सुत्रांनी स्पष्ट केले.
जितेश हिनहोरिया याला २१ ऑक्टोबरला रात्री पावणेआठ वाजता डीआरआयच्या पथकाने अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास इंटेलिजन्स ऑफिसर विशाल सांगवान हे करीत आहेत. दरम्यान, त्याच रात्री त्यांनी १०.३० वाजता हवालदार जसा राम, पी. एस. कुलकर्णी, मयंक कुमार यांच्या ताब्यात दिले आणि ते निघून गेले. त्यानंतर २२ ऑक्टोबरला सकाळी सव्वादहा वाजता हिनहोरिया बाथरूमला गेला. आतून कडी लावून घेत त्याने बाथरूमच्या काचेने मान आणि हातावर मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून सांगवान यांच्या फिर्यादीवरून सिडको ठाण्यात कलम ३०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सिडको पोलिस करीत असून त्यांनी हिनहोरियाचे कपडे जप्त केले आहेत.
जितेश हिनहोरियाला ताब्यात घेतल्यानंतर २१ ऑक्टोबरला अटक केली. त्याच्या अटकेची माहिती देण्यासाठी पथकाने त्याची पत्नी मनीषा हिनहोरिया यांना फोन केला असता, त्यांचा मोबाइल बंद होता. त्यामुळे हिनहोरियाच्या अटकेची माहिती त्याचा साडू जितेंद्र केवडिया यांना देण्यात आली. मनीषा हिनहोरिया यांनी मोबाइल का बंद केला? त्यांचे घर कारवाई झाल्यापासून बंद आहे. कुटुंबीय सध्या कुठे आहेत? यांसारखे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
डीआरआय पथक पैठण आणि वाळूज एमआयडीसीतील दोन्ही कंपन्यांचे वर्षभराचे रेकॉर्ड तपासणार आहे. या कंपन्यांचे मूळ उत्पादन काय?, त्यासाठी त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे किती केमिकल्स आणले?, या केमिकल्सपासून मूळ उत्पादन किती तयार झाले?, उर्वरित केमिकल्सचा ड्रग्ज निर्मितीसाठी वापर केला का? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे यातून शोधण्याचा प्रयत्न हे पथक करणार आहे. याशिवाय पथकाने जप्त केलेले ड्रग्ज आणि रसायन फॉरेन्सिक पथकाला सोपविले असून, ते तपासणी करून अंतिम अहवाल देतील. त्यानंतरच पुढील कारवाईला वेग येईल.