गौतम बचूटे/केज :
पतीच्या मित्राकडून महिलेवर बळजबरीने शारीरिक संबंध केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून संशयित आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील एका गावात दि. २७ रोजी एका मुलाची आई असलेल्या विवाहितेचा नवरा हा ट्रक ड्रायव्हर आहे. तो ट्रक घेवून बाहेरगावी गेला होता. त्याच्या घरी त्याची पत्नी व वृध्द आई होती. त्याच वेळी गावात रामकृष्णहरी सप्ताह सुरू असल्याने तिची सासू जेवण आटोपून मंदिरात जप करण्यासाठी गेली होती. घरी विवाहिता एकटीच झोपलेली होती. दि. २८ ऑगस्ट रोजी मद्यरात्री १:०० ते १:३० वाजण्याच्या सुमारास शौचास घराबाहेर गेली असताना; तिच्या नवऱ्याच्या मित्राने संधी साधून घरात प्रवेश केला.
थोड्या वेळात ती विवाहिता घरात आली असता नवर्याचा मित्र घरात आल्याचे दिसून आले. त्यावेळी तीने त्याला "तू का घरात आलास?" असे विचारले असता, त्यावेळी त्याने "तू मला आवडतेस." असे म्हणून तिच्या इच्छे विरुद्ध तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने आरडा ओरडा करताच त्याने जर हा प्रकार कुणाला सांगितला तर जिवे मारण्याची धमकी देवून निघून गेला.
त्या नंतर शेजारचे लोक या ठिकाणी जमा झाले. तिची सासू सुद्धा घरी आली. त्या पीडितेने तिच्यावर बेतलेला प्रसंग तिच्या वडिलांना कळविला या नंतर तिचे वडील आणि दिर सुद्धा उपस्थित झाले. त्यांनी पीडितेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात तिच्या नवऱ्याच्या नराधम मित्रा विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.