

Beed Takewadi Jal Samadhi Andolan
गौतम बचुटे
केज : राजश्री उमरे- पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. मात्र, त्यांच्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ आज (दि. ११) धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी टोकेवाडी येथील तलावात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. दीड तासांपासून आंदोलक पाण्यात ठाण मांडून होते.
बीड जलसंपदा विभागाचे अधिकारी लब्बा आणि ढाकणे यांनी आंदोलकांशी संपर्क साधून त्यांना सोमवार पर्यंत तलावाच्या संबंधित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रशासनाला आंदोलकांची समजूत काढण्यात यश आले असून अडीच तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, पोटात पाणी गेल्यामुळे दोन आंदोलकांना पाणबुडे आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले आहे. तर काही आंदोलक हे झाडावर चढले आहेत. त्यामुळे पोलिस आणि महसूल प्रशासनाची दमछाक झाली .
जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत पाण्याबाहेर न येण्याचा निर्धार आंदोलकांनी केला होता. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी स्वतः तलावात उतरून आंदोलकांशी चर्चा केली.
आठ दिवसांपासून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने कोरडेवाडी येथे राजश्री उमरे- पाटील यांनी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार नुकसान भरपाई देण्यात यावी. ज्ञानाराधा मधील ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात याव्यात आणि कोरडेवाडीच्या नियोजित साठवण तलावाला पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसह इत्तर मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला आठ दिवस उलटून गेले तरी प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही.