

Tired of being harassed by his wife and in-laws, he ended his life.
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : सासरकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भागवत अंकुश राठोड (रा. गे- वराई तालुका) असे मृत तरुणाचे नाव असून, आत्महत्येच्या प्रकरणी त्याची पत्नी राणी राठोड, सासरा संतोष राठोड आणि मामेसासरा दत्ता राठोड या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तलवाडा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भागवत राठोड याचे वैवाहिक आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून तणावात होते. पत्नी व सासरच्या मंडळींकडून ते सतत मानसिक छळ, ताणतणाव आणि अवहेलना सहन करत होते. या सततच्या त्रासामुळे ते नैराश्यात गेले होते. शेवटी १ ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरच्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात त्यांनी आपल्या मानसिक वेदना, पत्नी व सासरच्या मंडळींनी दिलेला त्रास आणि जगण्याची उरलेली इच्छा संपल्याचे स्पष्ट शब्दात नमूद केले आहे. अवघ्या दोन महिन्यांतच सासरचे मंडळी त्यांचा अतोनात छळ करत असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यांत त्यांनी या त्रासाचा शेवट केला. दरम्यान ही चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात असून, तिच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या नोटमधील मजकूर वाचून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
"माझा मुलगा निर्दोष होता" घटनेनंतर काही दिवस मानसिक धक्क्यात असलेल्या भागवतच्या आई सुनिता राठोड यांनी अखेर धैर्य एकवटून तलवाडा पोलिस ठाण्यात अकरा ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून त्याचा तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा तपास अधिकारी यांनी विश्वास दिला आहे.