धोंडराई, पुढारी वृत्तसेवा : तळणेवाडीतील अंगणवाडी सेविकेचे सोमवारी (दि. ५) दिवसाढवळ्या घर फोडले होते. ही घटना ताजी असताना शुक्रवारी (दि. ९) रात्री ११. १५ वाजता तळणेवाडी अंतर्गत शेवगाव उमापूर मुख्य रस्तालगट असलेल्या ऐउकेच्या शेतवस्तीवर शस्त्रास्त्राचा धाक दाखवत दरोडा टाकला. यावेळी मेन गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी मारहाण करत सोन्याचे दागिने लांबविले. तर भोजगाव येथेही चोरट्यांनी ५ ते ६ तोळ्यांचे सोने लुटून नेले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Beed News)
भोजगाव येथील दिनकर संत यांच्या घरी चाकूचा धाक दाखवत चोरी झाली. रात्रीत दोन ठिकाणी घरफोडी करून जवळपास ५ ते ६ तोळ्यांचे दागिने चोरले. यावेळी ऐडके वस्ती येथे चोरट्यांची आणि घर मालकामध्ये झटापटी झाली. तळणेवाडी येथील उमर रियाजोद्दिन काजी व संतोष पवार यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली. यावेळी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. ४ लाखांचे सोने आणि रोकड चोरट्यांनी पळविली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. परंतु श्वान परिसरातच घुटमळल्याने माग निघू शकला नाही.
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याबाबत सरपंच अविनाश धस यांनी गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांना निवेदन देऊन रात्री पोलिसांची गस्त घालण्याची मागणी केली आहे. तसेच अवकाशात ड्रोन फिरविण्यासाठी पोलिसांची परवानगी आहे का ? याची माहिती घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.