परळीत जुन्या गावभागात घुसले सरस्‍वती नदीचे पुराचे पाणी

साखर झोपेतील नागरिकांची उडाली तारांबळ, एक हजार घरे बाधित
The flood waters of the Saraswati river entered the old village area of ​​Parli
परळीत जुन्या गावभागात घुसले सरस्‍वती नदीचे पुराचे पाणीPudhari Photo
Published on
Updated on

परळी वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा

परळी शहरातील जुन्या गावभागात सरस्वती नदीच्या पुराचे पाणी घुसले. सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीच्या पात्राला पूर आला आहे. पहाटेच्या वेळी पुराचे पाणी घरांमध्ये घुसले. यामुळे साखर झोपेतील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस चालू आहे. सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला पूर आला आहे. या नदीचे पाणी आंबेवेस भागातील पुलावरून वाहू लागले. हे पाणी शहरातील अंबेवेस, बरकत नगर, रहमतनगर, इंदिरानगर, भिमानगर, कृष्णा नगर, गोपाल टॉकीज रोड, गंगासागर नगर, कुरेशी नगर, भोईगल्ली, सिद्धार्थ नगर, सर्वे नंबर ७५ मधील घरात आज (मंगळवार) पहाटे ५ वाजता पाणी शिरले आहे.

जवळपास १ हजार कुटुंबाच्या घरात पाणी घुसून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या भागातील घरात चार फूट पाणी साचले. अनेकांच्या घरात चिखल झाला आहे. यामुळे या भागात हाहाकार माजला. पहाटे साडेपाच वाजता परळीचे उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, नगरपालिका मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, उपमुख्य अधिकारी संतोष रोडे, नगर अभियंता ज्ञानेश्वर ढवळे, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन स्वच्छता विभागाचे शंकर साळवे, सुनील आदोडे यांनी भेट देवून पाहणी केली.

पंचनामे करण्यासाठी पथक नियुक्त

मुसळधार पावसामुळे परळीतील सरस्वती नदीला पूर आला आहे. १००० कुटुंबाच्या घरात पाणी शिरले आहे. प्रशासनाने तातडीने भेट देऊन या भागातील नागरिकांना नऊ ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन केले. तसेच या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी एक पथक नेमण्यात आले. या पथकात तलाठी, नगरपालिका कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी असतील अशी माहिती परळी उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली. 

नऊ ठिकाणी नागरिकांच्या निवाऱ्याची सोय

परळी नगरपालिकेच्यावतीने पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आल्‍याचे परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी सांगितले. पूरग्रस्त भागातील लोकांना निवाऱ्याची सोय परळीतील  शाही फंक्शन हॉल बरकत नगर, मिलिया स्कूल, बागवान शादी खाना, जिल्हा परिषद शाळा बरकत नगर, समाज मंदिर, भीमानगर, झमझम पार्क इर्शाद नगर, कुरेशी शादी खाना या ठिकाणी करण्यात आली आहे.

अतिक्रमणांच्या विळख्यात सरस्वती नदी

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून परळी शहराच्या जुन्या भावभागातून वाहत असणाऱ्या सरस्वती नदीचे पात्र कमी-कमी होत गेले आहे. या पात्राच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे व झालेल्या बांधकामांमुळे नदीपात्र कमी झाले आहे. या नदीला नाल्याचे स्‍वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस होत नसल्याने गेल्या सात ते आठ वर्षात याची जाणीव झालेली नव्हती, मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि सरस्वती नदीने रौद्ररूप धारण केले व नागरि वस्त्यांमध्ये हे पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली.

नदीपात्राची स्वच्छता व गाळ न काढल्याने परिस्थिती

सरस्वती नदी ही शहरातील नागरी वस्त्यांमधून जाते. या नदीपात्राच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर नागरीवस्त्या झालेल्या आहेत. मात्र या नदीला प्रवाहित ठेवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. त्याचप्रमाणे या नदीत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. नगरपालिकेच्यावतीने सातत्याने या नदी पात्राची स्वच्छता करणे, त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी यातील गाळ काढून घेणे ही कामे होणे गरजेचे असते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने सरस्वती नदीला आठ वर्षांत पहिलाच पूर आल्यानंतर नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरून दाणादाण उडाल्याचे चित्र पहायला मिळाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news