परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा
पवित्र श्रावणमास सुरु असुन या श्रावण महिन्यातील आज चौथा श्रावण सोमवार आहे. त्यामुळे श्रीकृष्णआष्टमी, कृषी महोत्सव यामुळे परळी वैजनाथ येथे राज्यभरातून गर्दी वाढली असल्याचे दिसून आले. शिवभक्तांच्या काल रविवार सुट्टीचा दिवस व आज श्रावणातील सोमवार असल्याने या दोन दिवसांत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शनाला रांगा लागल्याचे दिसून आले.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे सध्या श्रावण पर्वकाळ सुरू आहे. दर श्रावण सोमवारी भाविकांची दर्शनाला गर्दी होत आहे. त्याच अनुषंगाने आज चौथा श्रावण सोमवारी लाखोच्या संख्येत शिवभक्तांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले. काल रविवारी मध्यरात्रीपासूनच दर्शनाला रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर आज श्रीकृष्णाष्टमी व श्रावण सोमवार असा योग होता. त्याचबरोबर परळी येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा अखेरचा दिवस असल्यामुळे परराज्यातून व राज्यभरातून बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांनीही ज्योतिर्लिंग दर्शनाची पर्वणी साधली. त्यामुळे भाविकांची परळीत मोठी गर्दी झाली होती.
परळी वैजनाथ येथे प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी पहिल्या सोमवारपासूनच मोठी गर्दी होताना दिसत आहे. आज चौथा श्रावणी सोमवार असल्याने व योगायोगाने आजच श्रीकृष्णाष्टमी व कृषी महोत्सवाचा अखेरचा दिवस हे सर्व एकत्र घडत असल्याने बाहेरगावाहून हजारो भाविक कालपासूनच परळीत दाखल झालेले आहेत. दोन दिवसांपासून लाखो भाविकांनी पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचे दर्शन घेतले. श्रावणी सोमवारी वाढलेली भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेल्याचे दिसून आले. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने सोमवारचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन भाविकांच्या दर्शनाची विशेष व्यवस्था केली होती. नेहमीप्रमाणेच पुरुष व स्त्रियांसाठीच्या स्वतंत्र रांगा व पासधारकांची स्वतंत्र रांग अशा पद्धतीने शिवभक्तांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. दर सोमवार प्रमाणेच नाथ प्रतिष्ठानच्या वतीने परळीत दाखल होणाऱ्या भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू व फळांचे वाटप करण्यात आले. दुपारनंतर भाविकांची संख्या वाढल्याचे दिसून आले. शिवभक्तांनी प्रभु वैद्यनाथाचा जयघोष करत चौथ्या श्रावण सोमवारच्या दर्शनाची पर्वणी साधली.
आमदार पंकजा मुंडे यांनी प्रभु वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. नाथ प्रतिष्ठानच्या स्टॉलमध्ये भाविकांना साबुदाणा खिचडीचेही त्यांनी वाटप केले. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे यांनी श्रावण महिन्यानिमित्त आज (सोमवार) परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. आज चौथ्या सोमवारी पंकजा मुंडे प्रभू वैजनाथ दर्शनाला आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत मातोश्री प्रज्ञाताई मुंडे याही उपस्थित होत्या. प्रभु वैद्यनाथ दर्शनानंतर आ. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांसाठी उपवास खिचडी वाटप च्या स्टॉलला भेट दिली. त्याचप्रमाणे या स्टॉलमध्ये पंकजा मुंडे यांनी भाविकांना साबुदाणा खिचडी व फळांचे वाटपही केले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.