आष्टी : पुढारी वृत्तसेवा
अंभोरा ठाण्याअंतर्गत असणारे मौजे शिरापूर येथील अमीर भैया सय्यद याला दोन वर्षापूर्वी २०२२ मध्ये न्यायालयाने जन्मठेप सुनावली होती. त्याच्यावर अंभोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पॅरोलवरील हा गुन्हेगार गेल्या दोन वर्षांपासून फरार होता त्याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले.
जन्मठेप लागलेला आरोपी अमीर भैय्या सय्यद रा. शिरापूर, ता. आष्टी हा सन 2022 मध्ये पॅरोल रजेवर असल्यापासून फरार होता. नमूद गुन्ह्यातील आरोपी अमीर सय्यद याचा गुप्त बातमीदारामार्फत मिळेलेल्या माहितीच्या अनुषंगाने शोध घेण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी मंगेश साळवे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे, शरद पोकळे यांनी त्याला पकडण्यासाठी ट्रॅप लावला होता. या दरम्यान तो एका हॉटेलमध्ये मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यास आज न्यायालयात हजर करुन पुढील कार्यवाही चालू आहे. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे त्याची रवानगी करणे सुरू आहे.
सदरचा आरोपी अत्यंत शातीर असून, यापूर्वी दोनदा पोलीसांच्या हातावर तुरी देऊन निसटलेला होता. या फरार आरोपीला पुन्हा गजाआड करण्यात आले आहे.