

Heavy rains hit: Coriander at Rs 400 in vegetable market
अतुल शिनगारे
धारूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकरी आणि ग्राहक दोघांच्याही जगण्याचा तोल बिघडवला आहे. शेतात उगवलेली पिकं चिखलात गाडली, तर बाजारात विक्रीसाठी आलेल्या भाज्यांचे दर आकाशाला भिडले. रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात भाजीपाल्यांनी अक्षरशः महागाईचा उच्चांक गाठला.
कोथिंबीर प्रति किलो ४०० रुपयांवर पोहोचली, तर मेथी २००, वांगी १२०, शेवगा १६०, फूलकोबी १२० आणि टोमॅटो ८० रुपये किलो या दराने विक्री होत असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांच्या शेतीत पाणी व चिखल साचला. परिणामी पिकांची मुळे कुजली, तर काही ठिकाणी भाजीपाला शेतातच सडून गेला. शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च आणि नुकसान या दोन्हीने ताण वाढवला आहे. शेतीला आधार देणारा हंगामच हातातून निसटल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दुसरीकडे बाजारातील भाववाढीने सामान्य ग्राहकांचं जगणंच कठीण झालं आहे.
महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. कोथिंबिरीसारखी साधी पालेभाजीही आता लक्झरी झाली आहे. पूर्वी जेवढ्या पैशात आठवड्याचा भाजीपाला घेत होतो, आता तेवढ्यात दोन दिवसांच्याही भाज्या मिळत नाहीत. रोजचा स्वयंपाक महाग झाला आहे असे गृहिणी श्रीमती माने यांनी सांगितले.
पावसामुळे वाहतुकीची साधनं बंद, शेतात पाणी साचल्याने तोडणी बंद आणि बाजारात माल येणं कमी, या सगळ्याचा थेट परिणाम भाववाढीवर झाला असल्याचे व्यापाऱ्यांचे मत असून पावसाचा जोर ओ-सरला आणि नवीन माल बाजारात आला, तर दर स्थिर होऊ शकतात. पण सध्यातरी परिस्थिती बिकट आहे.
अतिवृष्टीमुळे शेतात पिके उभी राहिली नाहीत. चिखलात शेती करता येत नाही, आणि माल बाजारात आणायलाही अडचण येते. परिणामी पुरवठा घटल्याने भाव वाढले असल्याचे भाजीपाला व्यावसायिक दादा चव्हाण यांनी सांगितले.
कोथिंबीरः ४००, मेथी : २००, टोमॅटो : ८०, वांगीः १२०, शेवगाः १६०, फूलकोबीः १२० या प्रमाणे दर असून अतिवृष्टीच्या या झटक्याने तालुक्यातील शेतकरी आणि ग्राहक दोघेही महागाईच्या चक्रात अडकले आहेत. शेतक-यांचे घामाने पिकलेले पीक पावसाने वाहन गेले, तर सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातून भाज्या भाववाढीमुळे बाहेर पडल्या आहेत. महागाई आणि नैसर्गिक आपत्ती यांच्या दुहेरी फटक्याने ग्रामीण अर्थव्यवस्था सध्या कोलमडली असून आता सरकारकडून मदतीच्या घोषने नंतर हातात कधी पडेल याच्या आशेत आहे.