

Crops on seven lakh hectares damaged due to heavy rains
बीड, पुढारी वृत्तसेवा: सप्टेंबर महिन्यात बीड जिल्ह्यात झालेल्या अत्तिवृष्टीमुळे तसेच पूर परिस्थितीमुळे जिरायत व बागायती अशा ६ लाख ६३ हजार १८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहेत. यामध्ये ७ लाख ८१ हजार ९२७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून तेराशेहून अधिक गावे यामुळे बाधित झाल्याची माहिती पंचनाम्यांमधून समोर आली आहे.
बीड जिल्ह्यात यंदा सरासरापेक्षा अधिक पाऊस झाला, परिणामी मांजरा, सिंदफणा, गोदावरी या प्रमुख नद्यांसह स्थानिकच्या नदी, ओढ्यांना देखील पूर आला होता. यामुळे शेतीपिकांचे, घरांचे, गोठ्यांचे मोठे नुकसान झाले. या सर्व ठिकाणये पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये अकरा तालुक्यांतील ७ लाख ८१ हजार ९२७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात ६ लाख ३८ हजार ४०२ हेक्टर,८ हजार ८५५ हेक्टर बायगातव ९२७ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे पूर्णपणे १७ घरांची पडझड झाली आहे तर ११२ घरांची अंशतः पडझड झाली तर १९३५ कच्च्या घरांची पडझड झाली. याबरोबरच २५४ गोठ्यांची पडझड झाली आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४ हजार ६०७कुटुंबांना मदत दिली जाणार आहे. यामध्ये प्रति कुटुंब दहा हजार रुपये तसेच दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ वाटप केले जाणार आहेत. यामध्ये २२२६ कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे मदत वितरित करण्यात आली आहे तर उर्वरित कुटुंबांना देखील मदत वाटप केली जाणार आहे.
सप्टेंबर महिन्यातील पूरपरिस्थिमुळे अकरा तालुक्यातील ३३२ गावे बाधित झाली होती. यामध्ये नदी, ओड्या काठची १२ हजार ९३५ हेक्टर जमीन खरवडून गेली असून याचा फटका ३३ हजार ४७७ शेतकऱ्यांना बसला आहे. तर अतिवृष्टीमुळे विहिरींचेही नुकसान झाले असून २९९ विहिरीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे तर १ हजार १४ विहिरींचे अंशतः नुकसान झाले आहे.
पूरपरिस्थिती तसेच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १०५ रस्त्यांचे तसेच ४४ पुलांचे नुकसान झाले आहे. ७१ शाळा इमारतींचे नुकसान झाले असून महावितरणला देखील या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यत्यारित असलेल्या इमारतींना देखील या अतिवृष्टीचा फटका बसला.