गौतम बचुटे, केज : केज पोलिसांच्या पथकाने गोवंशीय प्राणी आणि इतर प्राणी यांचे कत्तल केलेले शीर आणि हाडे यांची वाहतूक करणारी दोन वाहने वेगवेगळ्या कारवाईत ताब्यात घेतली आहेत. या बाबतची माहिती अशी की, सोमवारी (दि.२१) केज पोलिसांच्या रात्र गस्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांना ११२ क्रमांकावर माहिती मिळाली की, केज जवळील तांबवेश्वर वस्ती जवळ असलेल्या गुरुकुल धारुर रोड केज येथे टॅम्पोमधून (एमएच ०४ डीजी ६३६५) मधून प्रचंड दुर्गंधी येत आहे. त्यात काही तरी संशयित असावे.
माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे आणि पोलीस उपनिरीक्षक कादरी हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी त्या वेळी वाहना समोर काही युवक जमा झालेले होते. पोलीसांनी त्या ट्रकची ताडपत्री उघडून पाहिली असता त्या वाहनात गोवंशिय प्राणी आणि म्हशींचे कत्तल केलेले ४० मुंडकी व त्याला चिकटलेले मांस आणि हाडे असल्याचे आढळून आहे. पोलीसांनी सदर वाहन पोलीस ठाण्यात आणून ट्रक चालक सय्यद अलीम अजीज (रा. मोर्मीनपुरा बीड ता. जि ) यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुसऱ्या घटनेत नांदूर फाट्यावर पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस जमादार उमेश आघव, पोलीस नाईक महादेव बहिरवाळ आणि रशीद शेख यांनी कारवाई करून एक गोवंशीय प्राणी आणि म्हैस यांचे कत्तल केलेले मुंडकी व हाडे यांची वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी येथील आकाश गौतम जोंधळे आणि त्यांचे मित्र गणेश प्रभाकर दळगुंडे, कार्तिक राजेंद्र डोली, आकाश परसराम भंडारी, अजय साहेबराव आंबेकर, सुबोध संजय काळे हे तुळजापुर येथे दर्शनासाठी जात असताना त्यांच्या समोर धावत असलेल्या ट्रक मधून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी ११२ क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली. म्हणून पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. गुन्हा दाखल होताच पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. थकळरी, डॉ. मसने, डॉ.दीक्षांत जोगदंड, डॉ. प्रितम आचार्य, डॉ प्राजक्ता भोळे यांच्या पथकाने प्राण्याच्या अवशेषांची तपासणी करून अहवाल सादर केला आहे. सदर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेवून पोलीस ठाण्याच्या परिसरात उभा केला असता परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे रस्त्याने जाणारे नागरिक आणि तहसील, पंचायत समिती व न्यायालयाकडे जाणारे प्रत्येकजण नाकाला रुमाल लावून जात होते.