

केज: केज-कळंब रोडवर साळेगावजवळ ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास कार आणि पिक-अप यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
कळंबकडून येणाऱ्या भरधाव कारने साळेगावजवळील ११ के व्ही विद्युत उपकेंद्राजवळ एका पिक-अप (एम.एच.-३८/इ-२२३१) ला धडक दिली. अपघातात पिक-अपमधील योगेश रामकिसन राख (२०), सतीश आश्रुबा गित्ते (२५), चांगदेव राख (२५) आणि कारमधील राजेश उत्तरेश्वर वणवे (२१) व हंसराज नितीन पाटील (२२) हे जखमी झाले.
जखमींवर प्रथमोपचार उपजिल्हा रुग्णालय केज येथे करण्यात आला. त्यानंतर योगेश, सतीश, चांगदेव आणि राजेश यांना बीडमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, तर हंसराज यांना धाराशिव येथे हलवण्यात आले.
पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला हलवून वाहतूक सुरळीत केली. सदर अपघात पुलावरील जम्पिंगमुळे कार आदळून नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांतही या पुलावर अपघात झाला होता.