

Gevrai municipal election
सुभाष मुळे
गेवराई : आगामी गेवराई नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर नगरसेवक पदांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून या आरक्षणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या उत्सुकतेचा परमोच्च बिंदू गाठला असून, आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकारण नव्या चर्चांनी गजबजले आहे.
गेवराई येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील आरक्षण जाहीर करण्यात आले आहे, एकूण ११ प्रभागांतील २२ नगरसेवक पदांपैकी खुल्या गटासाठी ७, सर्व साधारण महिलेसाठी ६, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) ६, अनुसूचित जाती (एससी) ३, अशी विभागणी झाली आहे. त्यातच यावर्षी मोठ्या प्रमाणावर महिला उमेदवारांना संधी मिळाल्याने गेवराईत महिलाराजाचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
प्रभाग १ – (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण खुला,
प्रभाग २ – (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला,
प्रभाग ३ – (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला,
प्रभाग ४ – (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण खुला,
प्रभाग ५ – (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला,
प्रभाग ६ – (अ) अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला,
प्रभाग ७ – (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण खुला,
प्रभाग ८ – (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण खुला,
प्रभाग ९ – (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण खुला,
प्रभाग १० – (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण खुला,
प्रभाग ११ – (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण खुला अशा पद्धतीने सोडत झाली.
दरम्यान आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित किंवा बदलले गेल्याने त्यांना नवीन राजकीय पर्याय शोधावे लागतील. त्यामुळे काहींना पक्षांतर्गत समायोजन करावे लागेल, तर काहींना नवे प्रभाग गाठावे लागतील.
नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील महीलेसाठी जागा सुटल्यानंतर बुधवारी प्रशासनाने प्रभागाच्या नव्या आरक्षणात एकूण ९ नगरसेवक जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे या वेळी महिला उमेदवारांच्या सहभागात वाढ होणार असून, नगरपरिषदेत महिलांचे प्रतिनिधित्व लक्षणीय वाढेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
आरक्षण जाहीर होताच गेवराईतील सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या नव्याने तयार करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी प्रचाराची चुणूक दाखवण्यास सुरुवातही केली आहे. पुढील काही दिवसांत नवे गठबंधन, अंतर्गत बंडखोरी आणि राजकीय समीकरणांचे नवे नाट्य उलगडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.