

Beed Crime News: Suspicious death of a woman who went to his daughter
वडवणी, पुढारी वृत्तसेवा वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी पाझर तलावात एका ५७वर्षीय महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या कंबरेला व साडीला अंदाजे चाळीस किलो वजनाचा मोठा दगड बांधलेला आढळला असून, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा ठाम आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मृत महिला आशाबाई प्रल्हाद करांडे (रा. पिंपळनेर, ता. वडवणी) या मुलीला भेटण्यासाठी खंडोबाचीवाडी येथे आल्या होत्या. शुक्रवारी (ता. २४ ऑक्टो.) मुलीसोबत शेतात बाजरी मोडण्यासाठी गेल्या होत्या. काम आटोपल्यावर मुलगी शेतातच थांबली, तर आशाबाई घरी निघाल्या; मात्र त्या घरी न पोहोचल्याने शोधमोहीम सुरू झाली.
नातेवाईकांकडे चौकशी करूनही काहीच धागादोरा न लागल्याने जावयाने वडवणी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, दोन दिवसांनी म्हणजेच रविवारी (ता. २६ ऑक्टो.) दुपारी साडेतीनच्या सुमारास डोंगरेवाडी पाझर तलावात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा भगाडे, उपनिरीक्षक राजू राठोड, हेडकॉन्स्टेबल विलास खरात, स.फो. अदिनाथ तांदळे, अंमलदार नवनाथ लटपटे, चालक रामनाथ शिनगारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात पाठवला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी (माजलगाव विभाग) डीवायएसपी शैलेश गायकवाड यांनी वडवणी पोलिस स्टेशनला भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
त्यांनी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र मृतदेहावरील स्थिती पाहता ही आत्महत्या की हत्या, याबाबतचे संशय अजूनही कायम आहेत.
शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांनी मृतदेहाचा खून झाल्याचा संशय व्यक्त करत खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. त्यांनी मृतदेह वडवणी पोलिस स्टेशनसमोर ठेवून ठिय्या मांडला.