

गौतम बचुटे
केज: केज-बीड रोडवरील एका पेट्रोल पंपाच्या दिव्याच्या उजेडात 'तीर्रट' नावाचा जुगार खेळणाऱ्या चार आरोपींना केज पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहिती आणि यशस्वी छापा:
गुरूवारी (दि.३० ऑक्टोबर) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर हे त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे, पोलीस हवालदार प्रकाश मुंडे आणि गोरख फड यांच्यासह रात्रगस्त घालत होते. यावेळी एका गुप्त खबऱ्याने त्यांना माहिती दिली की, केज-बीड रोडवरील रेणू पेट्रोल पंपाजवळ विजेच्या दिव्याखाली काही इसम 'तीर्रट' नावाचा जुगार खेळत आहेत.
चौघे जुगारी पोलिसांच्या ताब्यात
माहिती मिळाल्यावर रात्री ८:४५ वाजता क्षीरसागर व त्यांच्या पथकाने तातडीने छापा टाकला. यावेळी अशोक दादाराव भोसले (४०, रा. पांढऱ्याचीवाडी), प्रदीप प्रभाकर भोसले (२४, रा. पांढऱ्याचीवाडी), दादाराव भगवान भोसले (४२, रा. खरडेवाडी) आणि गोकुळ चत्रभुज भोसले (३२, रा. खरडेवाडी) हे चौघे गोलाकार बसून जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. यामध्ये त्यांच्याकडून रोख 13 हजार आणि दोन मोबाईल फोनसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४५ हजार रुपये आहे.
गुन्हा दाखल
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून या चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६००/२०२५, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १९८७ चे कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.