आष्टी : आष्टी तालुक्यातील एका गावामध्ये २५ वर्षीय गतीमंद, मुकबधीर मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) उघडकीस आली होती. या घटनेतील चारपैकी दोन संशयीत आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अद्याप दोघेजण फरार आहेत.
अंभोरा पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द पोउपनि देवीदास सातव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सपोनि मंगेश साळवे यांना २५ वर्षीय गतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची गोपनीय माहिती फोनवरुन मिळाली. सपोनि साळवे यांनी तात्काळ पोउपनि देवदास सातव, पोलीस अंमलदार सुदाम पोकळे यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी पीडित मुलीसह तिच्या आईकडीलांना पोलिस ठाण्यात आणून घडलेल्या घटनेची माहिती देऊन तक्रार नोंदवणेबाबत सांगीतले. मात्र पीडितेच्या आई-वडीलांनी तक्रार देण्यास नकार दिला. या घटनेची माहिती सपोनि साळवे यांनी पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मिना यांना दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिडीतेची वैद्यकीय तपासणी करुन सरकार तर्फे पोउपनि देवीदास सातव यांच्या फिर्यादीवरुन अंभोरा पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून अवघ्या दोन तासात दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळून गजाआड केले. उर्वरित फरार दोघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याचे सपोनि मंगेश साळवे यांनी सांगीतले.