बीड; पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा, अशी मागणी करत यशवंत सेना धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. सरकारने अनेकदा आश्वासने दिली, एकदाही त्याची पूर्तता केली नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण प्रश्न सोडवू, या वल्गनाही फोल ठरल्या. यामुळे सरकारने तत्काळ धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा; अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा यशवंत सेनेचे नेते भारत सोन्नर यांनी दिला.
ते म्हणाले, अनेक वर्षांपासून धनगर समाज एसटी आरक्षणापासून वंचित राहिला आहे. हा अन्याय दूर करावा म्हणून धनगर समाजाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत धनगर समाजाला ठोस आश्वासन देत एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी शासनाचे एक शिष्टमंडळ इतर राज्यांमध्ये जाऊन धनगर समाजाचा आरक्षणाचा अहवाल देऊन आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. याला 50 दिवसांचे अल्टिमेटम देण्यात आले होते. याची मुदत संपली तरी सरकारने कुठलेही ठोस पाऊल उचललेले नाही.