नांदेड : कारागृहात मयत झालेल्या आरोपीचे इन कॅमेरा शवविच्छेदन | पुढारी

नांदेड : कारागृहात मयत झालेल्या आरोपीचे इन कॅमेरा शवविच्छेदन

नांदेड; पुढारी वृत्तसेवा

एनसीबीच्या टीमने नांदेडमध्ये अंमली पदार्थांच्या साठ्यावर छापा मारून अटक केलेल्या आरोपींपैकी एका आरोपीचा कारागृहात मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शासकीय रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा अहवाल तहसीलदारांना पाठविण्यात आला आहे. आरोपीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे आता तहसीलदारांच्या खुलाशानंतरच स्पष्ट होणार आहे.

एनसीबीच्या टीमने 22 नोव्हेंबर रोजी शहराजवळील बोंढार शिवारात छापा मारला होता. यावेळी 100 किलो पोपिस्ट्रा आणि दीड किलो अफीम जप्‍त केले होते. या प्रकरणात एनसीबीने चार आरोपींना अटक केली होती. हे चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या आरोपींपैकी जितेंद्रसिंघ भुल्लर या आरोपीचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले होते.

शनिवारी शवविच्छेदनासाठी भुल्लरचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला होता. येथे इन कॅमेरा त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल रुग्णालय यंत्रणेने नांदेड तहसीलदार यांच्याकडे पाठविला. भुल्लरचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

शुक्रवारी कैदी क्र.2292 जितेंद्रसिंघ भुल्लर हा बॅरेकमध्ये झोपला होता. सोबतच्या इतर कैद्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. ही माहिती कारागृहातील सुरक्षा रक्षकांना देण्यात आली. त्यानंतर भुल्लरला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते.

हेही वाचा

Back to top button