बीड : ढगाळ वातावरणाने तुरीला फटका, हरभरा, ज्वारी अळीच्या विळख्यात | पुढारी

बीड : ढगाळ वातावरणाने तुरीला फटका, हरभरा, ज्वारी अळीच्या विळख्यात

नेकनूर; पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे ढगाळ वातावरणाने तुरीला फटका बसला आहे. तर हरभरा, ज्वारी पिके अळीच्या विळख्यात सापडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दिवाळीच्या दरम्यान बहरलेल्या तुरीला ढगाळ वातावरणामुळे फुलगळती होऊन फटका बसला आहे. सातत्याने वातावरण बदलत असल्याने अळीचा प्रादुर्भाव हरभरा, ज्वारी पिकांवर पडला आहे. परिसरतील ज्वारीच्या पोग्याला अळीने भक्ष्य बनविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

खरिपाच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या पिकांना पावसाने झोडपल्याने सोयाबीनचे फार मोठे नुकसान झाले आहे. असाच पुढील काळात जोरदार पाऊस पडत राहिल्यास आणखीही काही पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

खरिपातील पिकांना जास्तीच्या पावसाचा फटका बसला तर रब्बी हंगामात बदलणारा मोसम पिकांची वाट लावण्याच्या मार्गावर असल्याचे दिसू लागले आहे. वीज कंपनीच्या वसुलीने अनेक गावात पिकांना पाणी देण्याच्या भरात वीज खंडित करण्याची मोहीम तापदायक ठरत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button