औरंगाबाद : अवैध वाळू विरोधी पथकाच्या वाहनावर घातले ट्रॅक्टर | पुढारी

औरंगाबाद : अवैध वाळू विरोधी पथकाच्या वाहनावर घातले ट्रॅक्टर

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण ( औरंगाबाद ) येथील तहसील कार्यालयाच्या अवैध वाळू विरोधी पथकाच्या शासकीय वाहनावर अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर घालून शासकीय वाहनाचे मोठे नुकसान केले. यावेळी सुदैवाने पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना कोणतेही दुखापत झाली नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

अधिक माहिती अशी, पैठण तालुक्यात ( औरंगाबाद ) उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी वाळू विरुद्ध भरारी पथक निर्माण केलेले केले आहे. सोमवार रात्री नऊ वाजता या पथकातील अधिकारी मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, तलाठी लक्ष्मीकांत गोजरे, निलेश आहेर, कोतवाल दीपक नवगिरे, सतीश दळवे, गोपाल वैद्य हे तहसील कार्यालयाचे शासकीय वाहनाने (क्र.एमएच २०सीयू 125) रात्री ८:३० च्या सुमारास पैठण पासून जवळच असलेल्या पाटेगाव येथून जात होते.

यावेळी या पथकाने पाटेगाव ( औरंगाबाद ) मधून लाल रंगाचे अवैद्य मुरूम भरलेला विना क्रमांकाचे ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी अज्ञात चालकाने ट्रॅक्टर शासकीय वाहनावर घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शासकीय वाहनाचे मोठे नुकसान झाले असून कुणालाही दुखापत झाली नाही.

तात्काळ पैठण ( औरंगाबाद ) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल. ट्रॅक्टर वाहनावर घालून चालक फरार झाला. रात्री उशिरापर्यंत मंडळ अधिकारी गणेश सोनवणे यांच्यातर्फे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Back to top button