हिंगोली: पुढारी वृत्तसेवा: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरफोडीचे लायसन्स देऊन टाका. ते आता घरफोडे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे कमळ निवडणूक चिन्ह काढून त्या जागी हातोडा देऊन टाका, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. मी पुन्हा आलो. मात्र, दोन पक्ष फोडून आलो, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. Uddhav Thackeray On Devendra Fadnavis
सोमवारी (दि.१८) वसमत येथे कुटुंब संवाद कार्यक्रमानिमित्त सभा पार पडली. या सभेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते संजय राऊत, खासदार संजय जाधव, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, संपर्कप्रमुख बबन थोरात, मनोज आखरे, संदेश देशमुख, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर आदींची उपस्थिती होती. Uddhav Thackeray On Devendra Fadnavis
या दौर्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. शेतकर्यांच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी समाजात भांडणे लावण्याचे काम सत्ताधार्यांकडून सुरु आहे. यंत्रणा वापरून खंडण्या गोळा करणार्या भाजप व गद्दारांनी सरकारी यंत्रणा बाजूला ठेऊन निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान ठाकरे यांनी यावेळी दिले.
आता अच्छे दिन नाही, तर सच्चे दिन येणार असल्याचे सांगत देशाला भाजपची कीड लागली आहे. सगळ्यांची घरे तुम्ही फोडत आहात, पक्ष तुम्ही फोडत आहात, तुमच्या पक्षांमध्ये घरफोडे तयार झाले आहेत. त्यामुळे तुमच्या पक्षात नेतेच तयार झालेले नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे नेत्यांचा आदर्श सोडा, उलट आदर्शवादी नेते तुम्ही घेत असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला. या माध्यमातून त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी मोठ्या संख्येनेे शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा