जिंतूर दुय्यम निबंधक कार्यालयातील नेटसह लाईट बंद; नागरिक हैराण | पुढारी

जिंतूर दुय्यम निबंधक कार्यालयातील नेटसह लाईट बंद; नागरिक हैराण

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा

येथील तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालय (रजिस्ट्रार ऑफिस) मध्ये अनेक दिवसांपासून लाईट सेवा खंडित होत आहे. त्याचबरोबर इंटरनेटही बंद असल्याने शासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण झालीय.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील दुय्यम निबंधक कार्यालयात विविध प्रकारच्या खरेदी-विक्रीचे दस्त ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केले जातात. मात्र यासाठी आवश्यक असणारे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी बंद आहे. तसेच वारंवार वीजपुरवठाही खंडित होत असल्याने कार्यालयात दस्त नोंदणीचा बोजवारा उडाला आहे.

याबाबत दुय्यम निबंधक अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता, आम्ही संबंधित कार्यालयाला तक्रार दिली आहे. आमच्या हातात काही नाही. जोपर्यंत वरून कनेक्टिविटी व दुरुस्ती होत नाही तोपर्यंत काही करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व बाबींमुळे नागरिक हैराण झाले असून, दस्त नोंदणीसाठी त्यांना कार्यालयात दिवसभर बसावे लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

कर्मचारी व अभियंत्याचे फोन नॉटरिचेबल

शहरात  मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने शहरातील नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. सोमवारपासून विजेचा हा लपंडाव सुरू आहे. यामुळे गावातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वीज गेल्याची तक्रार करण्यासाठी नागरिक महावितरण कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात मात्र ते नेहमी नॉटरिचेबल असतात किंवा ते फोन कधीच उचलत नाही. महावितरण अभियंता यांचाही फोन नेहमी स्वीचऑफ येत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरूद्ध वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचलं का ?

Back to top button