
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर ते वारंगाफाटा मार्गावर दाती फाट्याजवळ आज (दि.१६) सकाळी नऊ वाजता अकोला येथून हैदराबाद येथे कोटक महिंद्र बँकेची ५ कोटी रुपयांची रोकड नेणारे वाहन उलटून अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. आखाडा बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनातील सर्व रोकड सुरक्षित आहे. Hingoli News
अकोला येथील कोटक महिंद्र बँकेची ५ कोटी रुपयांची रोकड घेऊन एक पिकअप व्हॅन (टीएस-11-युसी-6488) सकाळी अकोला येथून हैदराबादकडे जाण्यासाठी निघाली होती. सदर वाहन सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर ते वारंगाफाटा मार्गावर दातीफाटा येथे आले. यावेळी वाहनाच्या समोरील टायर फुटला. त्यामुळे चालक गणेश चिन्नापागा (रा. रंगारेड्डी, तेलंगणा) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाने तीन ते चार पलट्या खाल्या. Hingoli News
या अपघातात वाहन चालक गणेश याच्यासह जगुल्ला रामोजी मुकेश, लिंगाला निखील नरसिंम्लु, संजयचंद रामलखनचंद, लल्लनसिंग विश्वनाथ सिंग (सर्व रा. हैदराबाद, तेलंगणा) जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार राजीव जाधव, प्रभाकर भोंग, शिवाजी पवार, रिाजी बेले, रोहिदास राठोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आणले आहे. या प्रकरणी चालक गणेश याने दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.
हेही वाचा