Parabhani : फुलकळस पाटीजवळ दुचाकी अपघात; तरूणाचा मृत्यू | पुढारी

Parabhani : फुलकळस पाटीजवळ दुचाकी अपघात; तरूणाचा मृत्यू

ताडकळस (परभणी), पुढारी वृत्तसेवा

ताडकळस (Parabhani) येथे जवळच असलेल्या निळा येथील एका तरुणाचा दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना मध्यरात्री घडली. ही माहिती मिळताच ताडकळस येथील पोलीस कर्मचारी आणि काही तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, निळा येथील गोपाळ निवृत्ती सुर्यवंशी (वय-१८) हा तरुण ताडकळस येथील पुर्णा रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील एका हाॅटेलवर काम करीत होता. बुधवार १७ नोव्हेंबर रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास ताडकळस-शिंगणापूर रस्त्यावर फुलकळस पाटीजवळ दुचाकी अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी ताडकळस (Parabhani) येथील काही तरुणांना समजली असता त्यांनी तात्काळ ही माहिती सपोनि. विजय रामोड यांना दिली. त्यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक राजु नन्नवरे, रामकृष्ण काळे, गणेश चनखोरे, चालक चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. युवक गंभीर जखमी अवस्थेत असल्याने १०८ रुग्णवाहिकेला संपर्क केला होता. परंतु हा रुग्णवाहिका घटनास्थळी उशिरा आली.

दरम्यान या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या युवकाच्या पश्चात आई, वडील, ३ भाऊ असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताडकळस येथे रुग्णवाहिकेची गरज

पुर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व सुविधा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णांना परभणी येथील ग्रामीण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन सर्व सुविधा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

हे वाचलंत का ?

Back to top button