नाफेडची खरेदी केंद्र बंद होण्याच्या मार्गावर | पुढारी

नाफेडची खरेदी केंद्र बंद होण्याच्या मार्गावर

हिंगोली ; पुढारी वृत्‍तसेवा

राज्यात शेतकरी बांधवांचा उत्पादित माल खरेदी करण्यासाठी नाफेड खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. पण यावर्षी खरीप हंगामात शेतकरी बांधवांच्या उत्पादित मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपला उत्पादित माल मिळेल त्या भावामध्ये आडत बाजारपेठेत विक्री केला आहे. तर चांगला उत्पादित माल भाव वाढीसाठी शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेला आहे. यामुळे नाफेड खरेदी केंद्रावर याचा परिणाम झाला आहे.

दरवर्षी खरीप हंगामात उत्पादित माल शासनाच्या हमी भावाने नाफेड कडुन खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात येते. अगोदर शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री संघाकडे नोंदणी करावी लागत होती. पण या वेळेस मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात उत्पादित मालाचे नुकसान आणि शेतकरी बांधवांना कागदोपत्री पाठपुरावा करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. या बाबींमुळे शेतकरी बांधवांनी नाफेड खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे.

जवळा बाजार परिसरातील ५० ते ६० गावातील उत्पादित खरीप हंगामातील मालाची विक्री ही येथील बाजार समितीच्या यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. दरवर्षी नाफेडकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात खरिपातील मालाची आवक मिळत होती, पण यावर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि नाफेड खरेदी केंद्राकडे शेतकरी बांधवांनी फिरवलेली पाठ, सोयाबीनची न झालेली नोंदणी यामुळे भविष्यात नाफेड खरेदी केंद्र बंद होण्याच्या शक्यता निर्माण झालेली आहे.

Back to top button