देवगिरी प्रांत संघाचे माजी संघचालक ॲड. गंगाधरराव (दादा) ज्ञानदेव पवार (वय ७८) यांचे बुधवारी (१७ नोव्हेंबर) रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळगावी वझुर (ता. पूर्णा) येथे आज (गुरुवार) दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गंगाखेड – धारखेड व वझूर – रावराजूर या गोदावरी नदीवरील पुलाचे ते जनक म्हणून ओळखले जात होते.
वकील असलेले गंगाधरराव पवार हे दादा नावाने सर्वपरिचीत होते. सुरुवातीच्या दिवसात त्यांनी शिक्षक म्हणून अंबाजोगाई येथे कर्तव्य बजावले. त्यानंतर त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले. याच दरम्यान त्यांनी भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते परभणी जिल्हा संघचालक म्हणून कार्यरत राहिले. यानंतर त्यांची देवगिरी प्रांत संघचालक म्हणून निवड झाली.
देवगिरी प्रांत संघचालक म्हणून त्यांनी बराच वर्ष काम पाहिले. सध्या ते राष्ट्रीय सहकार निगम लिमिटेड, नवी दिल्लीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. या शिवाय जनकल्याण नागरी पतसंस्थेचे संचालक होते. शेतीमधील नवनवीन प्रयोगामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे. या शिवाय इतर विविध वित्तीय, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी ते निगडित होते. त्यांच्या सुस्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात एक भाऊ, पत्नी, उपजिल्हाधिकारी संजय, शास्त्रज्ञ विजय आणि इंजि. धनंजय ही तीन मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते असल्याने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांनी सुचवलेले विकास काम प्राधान्याने करीत असत.
संघातील कार्यकर्त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल ते सतत विचारपूस करीत असत. साधारणत: तीन वर्षांपूर्वी गंगाखेड- धारखेड व वझुर – रावराजुर या गोदावरी नदीवरील पुल बांधकामासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वझुर येथील कार्यक्रमात मागणी केली असता, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी तत्काळ मान्य करत आजपरिस्थितीत गंगाखेड – धारखेड स्लॅब लेव्हलला तर वझुर – रावराजूर पिलर लेव्हल पर्यंत उभा राहत आहे.