औंढा नागनाथ : पुढारी वृत्तसेवा : जिंतूर- औंढा मार्गावरील धारफाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातानंतर दुचाकीस्वराचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थळावरून ट्रक चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील गावकऱ्यांनी पाठलाग करून औंढा पोलिसांच्या ताब्यात दिले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गोजेगावजवळ ट्रक रोडखाली घसरला आहे. या घटनेत विठ्ठल मालिकार्जुन नागरे ( वय ४८, औंढा) असे दुचाकीस्वराचे नाव आहे.
संबंधित बातम्या
औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथील विठ्ठल मालिकार्जुन नागरे हे बुधवारी (दि.२९) रोजी रात्री ८ च्या सुमारास दुचाकीने (एम एच ३८-२२१०) गावाकडे परत जात होते. दरम्यान औंढा- जिंतूर मार्गावरील धारफाट्याजवळ मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एम एच २६ बी इ ०१५१) जोराची धडक दिली. या अपघातात विठ्ठल नागरे गंभीर जखमी झाले.
यानंतर आसपासच्या नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटना स्थळावर औंढा पोलिसांनी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान घाबरून ट्रक चालकाने घटना स्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी पोलिसांच्या त्याला ताब्यात दिले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.