धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या खजिन्यात अनेक पुरातन दागिन्यांची रास असून त्यात हिरे, माणिक, मोती, चंद्रहार, सूर्यहार, तन्मणी, शिरपेच यांसारखी दागिन्यांचे शेकडो प्रकार आहेत. कदाचित आपल्यातील अनेकांना माहिती नसेल अशाही नावांचे दागिने येथे आहेत. याच खजिन्याचे ऐश्वर्य वाढवतेय ती छत्रपती शिवरायांच्या नावांची असलेली १०१ मोहरांची माळ. ( Navratri 2023 )
संबंधित बातम्या
तुळजाभवानी मातेचा खजिना नेहमीच चर्चेत असतो. या खजिन्यात पुरातन काळापासून भर पडत आली आहे ती सोने, मौल्यवान दागिने, अलंकारांच्या रुपाने. अशा खास दागिन्यांची वर्गवारी करुन मंदिर संस्थानने सात पेट्यात ठेवली आहेत. यातील एक नंबर पेटीत अतिप्रचिन व शिवरांयाची नाव असलेली मोहरांची माळ आहे. पहिल्या पेटीतील आणि सहा नंबरच्या पेटीत असलेल्या दागिन्यांचा वापर वर्षभरातील सात पूजांवेळी केला जातो, असे तुळजा भवानीचे पुजारी अमर कदम – परमेश्वर यांनी सांगितले आहे.
छत्रपती घराण्याचे तुळजाभवानी मातेशी श्रध्देचे नाते ऐतिहासिक आणि अतूट आहे. इतिहासात नोंद असलेल्या अनेक घटना याची साक्ष देतात. दरम्यान, देवीच्या खजिन्यात छत्रपती शिवरायांच्या नावाने असलेली १०१ मोहरांची माळ खजिन्याचे ऐश्वर्य वाढवत आहे. या खजिन्यात हरपर रेवड्यांची माळ, बिंदी, बीजवरे, मुकूट, मोत्यांचे तुरे, कानजोड, शिरपेच, वेणी, डोक्याची फुले, नेत्रजोड, जडावा, कंबरपट्टा, सोन्याचे हात आदी दागिने आहेत.
तुळजाभवानी मातेच्या चैत्र शुध्द प्रतिपदा, शिराळशष्टी, भाद्रपद शुध्द अष्टमी, ललितापंचमी, बलिप्रतिपदा, मकर संक्रांत आणि रथसप्तमी या पुजांसाठी या प्राचिन दागिन्यांचे अलंकार देवीला घातले जातात. ( Navratri 2023 )
हेही वाचा :
तुळजाभवानीच्या खजिन्यात १०१ मोहरांची शिवछत्रपतींचे नाव असलेली माळ अनमोल असून ती ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची आहे. सर्व मोहरांचे प्रत्येकी वजन १० ग्रॅम आहे. लाल दोर्यात गुंफलेली माळ दोन पदरी असून एका पदरात ४९ व दुसर्या पदरात ५२ मोहरा आहेत. या मोहरांच्या एका बाजूला श्री. जगदंबा प्रसन्न व दुसर्या बाजूला श्री. राजा शिवछत्रपती असे कोरलेले आहे.
– प्रा. डॉ. सतीश कदम, (ज्येष्ठ इतिहास संशोधक, तुळजापूर)केवळ दोन पेट्यांतीलच दागिने पुजेवेळी बाहेर काढण्यापेक्षा वर्षभरातील इतर पुजांवेळी उर्वरीत पाच पेट्यांतील दागिनेही मंदिर संस्थानने बाहेर काढावेत. तेही देवीला घालावेत. त्यामुळे भाविकांनाही देवीच्या या प्राचिन दागिन्यांचे दर्शन होईल.
– अमर कदम – परमेश्वर, (तुळजाभवानीचे पुजारी, तुळजापूर)