छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कॅनॉटमध्ये अंबरदिवा लावलेली अन् विना क्रमांकाची बोलेरो सायरन वाजवित बेदरकारपणे पळविणाऱ्या हुल्लडबाज तरुणांना सिडको पोलिसांनी पकडले. धक्कादायक म्हणजे, ती गाडी सोयगाव तहसीलदारांची असल्याची माहिती समोर आली. तहसीलदाराच्या मुलाने मित्रांना सोबत घेऊन ही स्टंटबाजी केल्याचे स्पष्ट झाले. चालक मुलाकडे लायसन्सही नव्हते. पोलिसांनी ही गाडी जप्त केली. २२ ऑगस्टच्या मध्यरात्री साडेबारा वाजता कॅनॉट भागात हा प्रकार घडला, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
अधिक माहितीनुसार, मोहनलाल रेशमाजी हरणे हे सोयगावचे तहसीलदार आहेत. ते मूळचे हर्सूल येथील रहिवासी आहेत. त्यांना नुकतेच शासकीय वाहन मिळाले आहे. पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी मिळाली मात्र पासिंग व कुशनची कामे बाकी असल्याने त्यांनी ती गाडी हर्सूल येथील घरी ठेवली. 22 आॅगस्टच्या रात्री तहसीलदार हरणे यांचा मुलगा गौरवकुमार मोहनलाल हरणे (23, रा. हससिद्धीमाता मंदिर रोड, हर्सूल), त्याचा मित्र मानव महेश बंब (21) आणि अभिजीत ताठे (21, दोघे, रा. एम-२, एन-९, हडको) हे तिघे विना क्रमांकाची शासकीय गाडी घेऊन बाहेर निघाले. मानव बंब हा गाडी चालवित हाेता. त्याच्याकडे परवानाही नाही. विशेष म्हणजे, त्यांनी गाडीवर अंबरदिवा देखील लावलेला होता. २२ आॅगस्टच्या मध्यरात्री साडेबारा वाजता हे त्रिकूट कॅनॉट भागात आले.
अंबरदिवा असल्याने सायरन वाजवित ते बेदरकारपणे फिरु लागले. डायल ११२ चे अंमलदार तेव्हा त्याच भागात होते. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर तरुणांनी रॉंगसाईड गाडी दामटली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काही अंतरावर त्यांना रोखले. त्यानंतर हे वाहन सोयगाव तहसीलदारांचे असल्याचे समोर आले. रात्री ड्यूटीवर असलेले पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे आणि सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी या प्रकरणी सिडको ठाण्यात नोंद घेतली.
आम्हाला शासकीय वाहन मिळाले आहे. पासिंग आणि कुशनच्या कामासाठी ते वाहन हर्सूल येथील घरी ठेवले होते. मुलांना हे काम करून घेण्यास सांगितले होते. मात्र, त्यांच्याकडून नकळत ही चूक झाली आहे, असे सोयगावचे तहसीलदार मोहनलाल हरणे यांनी सांगितले.
पासिंग झाल्याशिवाय शोरूममधून गाड्या बाहेर न काढण्याचा नियम आहे. शासकीय वाहने विना पासिंगची बाहेर आली कशी?, त्यांचे वाटप झाले आणि तहसीलदारासारख्या जबाबदार अधिकाऱ्यांनी या गाड्या घरी नेल्या कशा? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत. 15 आॅगस्टला पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी विना क्रमांकाच्या गाड्यांचे लोकार्पण केल्यानंतर हा प्रकार समाेर आला आहे.