छत्रपती संभाजीनगर : मुलाचे भले व्हावे म्हणून मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

file photo
file photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : धनलाभ व्हावा आणि मुलाचे चांगले व्हावे, या हेतूने आईने पोटच्या २० वर्षीय मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचा क्रूर प्रकार समोर आला. आईनेच झोपलेल्या मुलीच्या अंथरुणावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. मुलीला वेळीच जाग आल्याने ती बचावली. १७ ऑगस्टला पहाटे साडेचार वाजता फुलेनगर, आंबेडकरनगर भागात ही घटना घडली. याबाबत पीडित मुलीने सिडको पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी २१ ऑगस्ट रोजी सिडको ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. पार्वती दादासाहेब हुलमुख (वय ४०, रा. गल्ली क्र. 1, फुलेनगर, आंबेडकरनगर) आणि शकुंतला आहेर (रा. मिसारवाडी), अशी आरोपींची नावे आहेत. पीडिता सुप्रिया दादासाहेब हुलमुख (२०) ही जखमी आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

अधिकची माहिती अशी की, सुप्रिया ग्रिव्हज कॉटन कंपनीत काम करते. तिच्या वडिलांचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आई पार्वती हुलमुख, मोठा भाऊ प्रसाद यांच्यासह ती तेथे राहते. पार्वती ही मागील काही दिवसांपासून जादूटोण्याचे प्रयोग करणाऱ्या शकुंतला आहेर हिच्या संपर्कात असते. तिनेच तुझ्या मुलाचे चांगले व्हावे आणि धनलाभ व्हावा, असे वाटत असेल तर मुलीला मारून टाकावे लागेल, असे पार्वतीला सांगितले. या अंधश्रद्धेला बळी पडून पार्वतीने मुलीचा नरबळी देण्याचे ठरविले. १६ ऑगस्टच्या रात्री सुप्रिया वरील मजल्यावरील खोलीत एकटी झोपी गेली. तिची आई आणि भाऊ खालच्या मजल्यात होते. १७ ऑगस्टच्या पहाटे साडेचार वाजता सुप्रियाच्या अंथरुणावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. काही क्षणात सुप्रियाला जाग आली. तेव्हा तिच्या अंगावरील गोधडी पेटलेली होती. तिने गोधडी दूर फेकून आरडाओरड करीत खालच्या मजल्यावर पळत आली. तेव्हा तिची आई पार्वती समोरच उभी होती. तिने सुप्रियाला काहीही मदत केली नाही. सुप्रियाचा भाऊ प्रसाद तेथे धावत आला. त्याने त्याच्याकडील गोधडीने सुप्रियाच्या कपड्यांना लागलेली आग पटकन विझविली.

चार दिवस तक्रार देण्यापासून रोखले

या प्रकारामुळे सुप्रियाला धक्का बसला. तिने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे ठरविले. तक्रार देण्यासाठी ती घरातून निघाली असता पार्वतीने तिला अडविले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. मात्र, पार्वतीने सुप्रियाला तक्रार देण्यासाठी जाऊ दिले नाही. 21 ऑगस्टला पार्वती घरी नसताना सुप्रियाने सिडको ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली. पोलिसांनी तिला मेडिकल मेमो दिला. वैद्यकीय तपासणीनंतर तिची फिर्याद घेतली. त्यावरून पार्वती आणि शकुंतला आहेर या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

यापूर्वीही मुलीला संपविण्याचा प्रयत्न

पार्वती हुलमुख ही अंधश्रद्धेच्या आहारी गेली आहे. जादूटोण्याचे प्रयोग करणारी शकुंतला आहेर हिने तिला मुलीला जीवंत मारून टाकले तर तुला धनलाभ होईल आणि मुलाचे चांगले होईल, असे सांगितले होते. तेव्हापासून पार्वती ही मुलगी सुप्रियाच्या जीवावर उठली होती. यापूर्वीही तिने तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर सुप्रिया सिडको ठाण्यातही आली होती. मात्र, कौटुंबिक प्रकरण म्हणून पोलिसांनी फारसे गांभीर्य दाखविले नव्हते. यावेळी मात्र, पोलिसांनी गंभीर दखल घेतली.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news