वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा वाळूज येथील औषध उत्पादन घेणाऱ्या कंपनीला (शुक्रवार) मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणात औषधी पॅकेजिंगचे रॉ- मटेरियल असल्याने दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आगीची धगधग सुरु होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज कंपनी व्यवस्थापकाच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील इंडको रेमेडिज (बी सेक्टर, प्लॉट क्र. २०) या कंपनीत सिरप टॅबलेट आदी औषधांचे उत्पादन घेण्यात येते.
शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या पाठीमागे असलेल्या स्टोअर रूममधून धुराचे लोळ निघत असल्याचे लगतच्या केशरदीप प्रेसिंग कंपनीतील सुरक्षा रक्षकाला दिसून आले. त्यांनी ही माहिती त्यांच्या सुरक्षा अधिकारी गौतम नवगिरे यांना तसेच इंडको कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला दिली. यानंतर त्यांच्यासह कंपनीतील कामगार व इंडको कंपनीच्या कामगारांनी पाण्याचा मारा सुरू करून आग विझविण्याचा प्रयन्त केला. मात्र कंपनीतील प्लास्टिक रॉ-मटेरियलने पेट घेतल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान अग्निशमन विभागाला आगीची माहिती देण्यात आल्याने एमआयडीसीचे दोन, बजाज ऑटो व गरवारे कंपनीचा एक-एक असे ४ तसेच खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.
कंपनीच्या स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी पॅकेजिंगचे रॉ-मटेरिअल असल्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आगीची धगधग सुरु होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत होते. आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश ताठे, पोलीस अंमलदार योगेश शेळके, बबलू थोरात आदी घटनास्थळी लक्ष ठेवून होते.
हेही वाचा :