हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : पंधरा दिवसांपूर्वी बळसोंड व कुरूंदा पोलिस ठाणे अंतर्गत येणार्या दरेगाव परिसरातील मोबाईल टॉवरच्या तांब्याची केबल व सोलर पॅनलची चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून गुरूवारी दोघांना गजाआड केले. त्यांच्याकडून तांब्याच्या केबलसह सोलार पॅनल व एक चारचाकी बोलेरो मॅक्स पिकअप असा एकूण 12 लाख 62 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
11 जुलै रोजी बळसोंड भागातील मोबाईल टॉवरच्या कार्यालयातील व्हरांड्यामधून 62 हजार रूपये किंमतीची तांब्याची केबल व अडीच हजार किमतीची दोरी असा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच कुरूंदा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या दरेगाव येथील सोलर पॅनलचे 14 नग चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी निर्देश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लु यांच्या पथकाने घटनास्थळी व परिसरात भेट देऊन तपास पद्धती व गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून माहिती घेतली असता औंढा तालुक्यातील येळी येथील गंगाधर नारायण सांगळे, बालाजी विठ्ठल घुगे यांनी चोरी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता दोघांनीही दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून टॉवरच्या तांब्याचे केबल, सोलार पॅनल व चारचाकी बोलेरा मॅक्स पिकअप ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंधरा दिवसात चोरीचा उलगडा करीत दोघांना गजाआड केले.
हेही वाचा :