कन्नड ; पुढारी वृत्तसेवा, तालुक्यातील मक्रणपूर येथील माजी सरपंच विनायक सोनवणे व सरपंच सणा असलम शेख यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमण केल्याची तक्रार केल्याचा राग धरून सामाजिक कार्यकर्ते बापू शांताराम गवळी यांना पंधरा महिलांनी चपलांनी मारहाण करत अक्षरशः धिंड काढत पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणाने कन्नड शहरात खळबळ उडाली आहे.
बापू शांताराम गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंधरा महिलांवर विविध कलमान्वये कन्नड शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हे दाखल झाले आहेत. मीराबाई रामलाल पवार यांनी बापू गवळी यांनी जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून फिर्यादी दिली. त्यानुसार त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिसा कडून मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते उदय ऑप्टिकलचे मालक बापू शांताराम गवळी (वय ३४) राहणार मकरणपूर यांनी कन्नड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सरपंच सना अस्लम शेख व माजी सरपंच विनायक सोनवणे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमण, राशनचा काळाबाजार या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चौकशी करून स़ंबंधित राशन दुकानाचा परवाना रद्द केला. तसेच सरपंच सना शेख यांनी गावठाण जमिनीवर अतिक्रमण केले आहे. त्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्याच्या रागातून मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास गुड्डू जाधव यांच्या जनरल स्टोअर मध्ये बसलेला असताना उषाबाई विनायक सोनवणे, सीमा अमोल सोनवणे, मीराबाई रामलाल पवार, उषाबाई (आडनाव माहिती नाही), वंदना प्रभाकर पवार, सुनिता कृष्णा गायकवाड, रेखा प्रकाश पवार, संगीता पुंडलिक काकडे, कविता संजय पवार, लताबाई सोनवणे, रेखाबाई गायकवाड, सुमित्रा बनकर व इतर पुरुष अशा 14 ते 15 जणांनी अचानक हल्ला केला व माझे कॉलर पकडून, शिवीगाळ करत चपलांनी, लाथा बुक्क्यांनी मारहाण करत माझी पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढल्याची तक्रार केली. यावरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात संबंधीत 15 महिलांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार जे.पी. सोनवणे व एस. के. तायडे हे करत आहेत.
याच प्रकरणात बापू शांताराम गवळी यांच्या विरोधात मिराबाई रामलाल पवार, (वय वर्षे 40) राहणार मकरणपूर यांनी कन्नड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, बापू शांताराम गवळी यास तू माझ्या नवऱ्याला का मारतो असे विचारले असता, फिर्यादीचा उजवा हात पिरगळत आक्षेपार्ह बोलल्यावरून बापू शांताराम गवळी यांच्याविरुद्ध अॕट्रासिटि कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गवळी यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड करत आहेत.
पोलीस ठाण्यापर्यंत सामाजिक कार्यकर्ते बापू शांताराम गवळी यांना पंधरा ते सोळा महिलांनी चपलांनी मारहाण करत अक्षरशः धिंड काढली. सदरील मारहाण सुरू असताना कोणीही नागरिक मध्ये पडला नाही, अनेकांनी मोबाईल मध्ये चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या तटस्थ भुमीकेची चर्चा होत आहे. पोलिस ठाणेही जवळ असताना अशी घटना घडली. याबद्दल नागरिकांत चर्चा आहे.
हेही वाचा :